बेस्टची तूट १,३१७ कोटींवर
अर्थसंकल्प सादर; वीज विभागावर परिवहनचा डाेलारा
सकाक वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : एकीकडे प्रवाशांना आधुनिक बससेवा देण्यासाठी तंत्रज्ञानाची जोड, तर दुसरीकडे वाढता खर्च आणि आर्थिक तुटीचे संकट, अशा कात्रीत बेस्ट उपक्रम सापडला आहे. परिवहन विभागाच्या उत्पन्नापेक्षा खर्चात मोठी वाढ होत असल्याने बेस्टची आर्थिक स्थिती चिंताजनक बनली आहे. २०२७-२८ च्या अर्थसंकल्पात तब्बल १,३१७.५० कोटी रुपयांची तूट अपेक्षित असून, वीज विभागाच्या उत्पन्नाच्या आधारावर परिवहन विभागाचा गाडा हाकण्याचे आव्हान बेस्टसमोर कायम आहे.
बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा यांनी आज बेस्ट समितीला सादर केला. त्यानुसार आगामी आर्थिक वर्षात बेस्टला ८,५५९.०६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. त्यासाठी ९,८७६.५६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. भांडवली कामांसाठी ६४७.७९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये बेस्टच्या परिवहन विभागाला ३,५५१.५५ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. या विभागाचा खर्च तब्बल ५,०७०.२६ कोटी रुपये राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या विभागाची तूट १,५१८.७१ कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. याउलट बेस्टच्या वीज विभागाकडून आर्थिक हातभार लागणार आहे. विद्युत विभागातून ५,००७.५० कोटी रुपयांचे उत्पन्न, तर ४,८०६.३० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे या विभागातून सुमारे २०१ कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे परिवहन विभागाच्या तुटीचा भार काही प्रमाणात कमी करण्यास मदत होणार आहे.
बससेवेला तंत्रज्ञानाची जोड
- प्रवाशांना सेवा देण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात तंत्रज्ञानावर विशेष भर देण्यात आला आहे. बेस्टची बहुप्रतीक्षित ‘एकात्मिक परिवहन व्यवस्थापन प्रणाली’ (आयटीएमएस) याच आर्थिक वर्षात कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे.
- या प्रणालीमुळे बससेवेचे रिअल-टाइम निरीक्षण, बस ट्रॅकिंग, मार्ग व वेळापत्रकाची माहिती तसेच प्रवास नियोजन अधिक सुलभ होणार आहे. बसगाड्यांत कॅमेरे बसवून चालकांच्या हालचालींवर केंद्रीय कमांड अँड कंट्रोल सेंटरमधून देखरेख ठेवण्यात येणार आहे.
- तिकीट व्यवस्था आणि प्रवाशांच्या तक्रार निवारण यंत्रणेत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्रवाशांची मागणी, मार्गावरील गर्दी आणि उपलब्ध डेटाच्या आधारे बससेवेचे नियोजन करण्यावर भर दिला जाणार आहे.
मोबाईलवरून तिकीट
बेस्टच्या तिकीट व्यवस्थेलाही डिजिटल स्वरूप देण्याच्या दिशेने पावले उचलण्यात आली आहेत. ओएनडीसी नेटवर्कच्या माध्यमातून क्यूआर कोडवर आधारित मोबाईल तिकीट सुविधा सुरू करण्यात आली आहे. वन तिकीट, फोन पे, पेटीएम, व्हाॅट्सअप, रेड बस रॅपिडो आदी डिजिटल माध्यमांवरून बेस्टचे तिकीट उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
पर्यटनासाठी ओपन डेक बस
मुंबईतील पर्यटनाला चालना देण्यासाठी छतविरहित दुहेरी मजली हेरिटेज/एचओएचओ बससेवा बेस्ट सुरू करणार आहे. या बससेवेद्वारे मुंबईतील ऐतिहासिक वास्तू आणि प्रमुख पर्यटनस्थळे पाहण्याची सुविधा पर्यटकांना उपलब्ध होणार आहे.
वीज वितरण यंत्रणेचे आधुनिकीकरण
बेस्टच्या विद्युत विभागाच्या पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणावरही अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. जुन्या ऊर्जा रोहित्रांसह सर्किट ब्रेकर बदलणे तसेच नवीन विद्युत वितरण उपकेंद्रे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईतील वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम आणि आधुनिक करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.