मुंबईतील हवा ‘दूषित’
११ हजार बांधकाम साइट्समुळे ३० टक्के प्रदूषण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : पावसाळा संपताच मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरण्यास सुरुवात झाली आहे. हिवाळा सुरू होण्यापूर्वीच शहरात प्रदूषणाची पातळी धोक्याच्या वळणावर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर यंदाचे सण-उत्सव फटाक्यांशिवाय साजरे करावेत आणि शहरातील बांधकाम क्षेत्रातील धूळ नियंत्रणात आणण्याची मागणी तीव्र करावी, असे आवाहन आवाज फाउंडेशनच्या वतीने मुंबईकरांना करण्यात आले आहे.
पावसामुळे हवेतील धुळीचे कण जमिनीवर बसून राहिल्याने प्रदूषण नियंत्रणात होते, मात्र आता पाऊस ओसरल्याने आणि समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्याचा वेग मंदावल्याने हवेतील दूषित कण एकाच ठिकाणी साचून राहत आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ताज्या आकडेवारीनुसार, वांद्रे पूर्व येथील खेरवाडी परिसरात ‘पीएम २.५’ ची सरासरी पातळी १५५ तर वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) १३८ नोंदीत झाली आहे, जी सुरक्षित मर्यादेपेक्षा खूप जास्त आहे.
सध्या मुंबईत ११,००० हून अधिक सक्रिय बांधकाम साइट्स सुरू आहेत. एका अंदाजानुसार, शहरातील एकूण हवा प्रदूषणात बांधकाम आणि पाडकामातून निघणाऱ्या धुळीचा वाटा जवळपास ३० टक्के आहे. त्यातच दिवाळी किंवा आगामी सणांमध्ये फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे विषारी रसायने आणि प्रचंड धूर हवेत मिसळणार आहे.
पर्यावरणपूरक उत्सव साजरा
बांधकामाची धूळ आणि फटाक्यांचा धूर एकत्र आल्यास मुंबईतील हवा अधिक घातक बनण्याची शक्यता आहे. याचा सर्वाधिक फटका लहान मुले, वृद्ध नागरिक आणि दमा किंवा हृदयाचा त्रास असलेल्या रुग्णांना बसू शकतो. त्यामुळे नागरिकांनी फटाक्यांचा वापर टाळून पर्यावरणपूरक उत्सव साजरा करावा आणि प्रशासनाने बांधकाम क्षेत्रातील धुळीवर कडक नियंत्रण ठेवावे, अशी मागणी आवाज फाउंडेशनच्या संस्थापक सुमैरा अब्दुलअली यांनी केले आहे.
................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.