नवरात्रोत्सवासाठी देवी मंदिरांत जय्यत तयारी
मुंबईसह उपनगरांतील प्रमुख मंदिरांत धार्मिक विधींची रेलचेल; गर्दी व्यवस्थापनासह सुरक्षेवर भर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि उपनगरांतील प्रमुख देवी मंदिरांमध्ये जय्यत तयारी सुरू असून, भाविकांच्या दर्शनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.
मुंबादेवी मंदिरात ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान नवरात्रोत्सव साजरा केला जाणार असून, या काळात नऊ दिवसांचा श्री चंडी महायज्ञ आयोजित करण्यात आला आहे. महालक्ष्मी मंदिरातही नवरात्रोत्सवानिमित्त विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
झवेरी बाजारातील मुंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत. मंदिरात पहिल्या दिवशी सकाळी ५.३० वाजता मंगलारतीने दर्शनाला सुरुवात होईल. त्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात करण्यात येईल. तसेच सकाळी ९ ते ९.२० या वेळेत पुजारी आणि विश्वस्तांच्या उपस्थितीत घटस्थापना केली जाणार आहे. नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत २५ पुजारी श्री दुर्गा सप्तशतीचे पठण करण्यात येणार असून, २० ऑक्टोबरला चंडी हवनाची पूर्णाहुती होईल. मंदिर रात्री १०.३० वाजेपर्यंत खुले राहणार आहे.
भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मंदिर परिसरात आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांना रांगेत उभे राहण्यासाठी रस्त्यावर मंडप उभारण्यात आला असून, पिण्याच्या पाण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी १०० हून अधिक स्वयंसेवक तैनात करण्यात येणार आहेत. तसेच भाविकांच्या बॅगा आणि साहित्याची तपासणी करण्यासाठी बॅगेज स्कॅनर मशीनचा वापर केला जाणार आहे.
आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी डॉक्टरांचे पथक रुग्णवाहिकेसह सज्ज ठेवण्यात येणार आहे. मंदिरात मोफत जोडे-चप्पल ठेवण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. भाविकांना सकाळी ५.३० ते रात्री १०.३० वाजेपर्यंत दर्शन घेता येणार आहे. दक्षिण मुंबईतील काळबादेवी मंदिर, बाबुलनाथ मंदिराजवळील डोंगरावरील दुर्गामाता मंदिर, खेरवाडी रोडवरील दुर्गामाता मंदिर, बोरिवली पूर्वेतील मोठा अंबा माता मंदिर, पश्चिमेकडील अंबा माता धाम आणि कांदिवली पश्चिमेतील चारकोप येथील शक्तिमाता मंदिरात नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे.
सुरक्षिततेला प्राधान्य
सुरक्षेच्या दृष्टीने स्थानिक पोलिसांना सहकार्य करण्यासाठी खासगी सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात येत आहेत. भाविकांना दर्शनासाठी रांगेतून प्रवेश दिला जाणार असून, गर्दीचे नियंत्रण आणि सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.