सीजेपीच्या आंदोलनामुळे रेल्वे वाहतुकीत बदल
मुंबईहून सुटणाऱ्या राजधानी एक्स्प्रेस तास उशिराने; सहा गाड्या रद्द
विरोधकांची टीका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : दिल्लीतील कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकांच्या परिसरात शनिवारी (ता. १०) संभाव्य वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने मुंबईहून सुटणाऱ्या दोन राजधानी एक्स्प्रेस पाच तास उशिराने सुटणार आहेत. याशिवाय, विविध मार्गांवरील पाच गाड्या पश्चिम रेल्वेने रद्द केल्या आहेत. सीएसएमटी-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसही ९ ऑक्टोबरसाठी रद्द करण्यात आली आहे. रेल्वेच्या या निर्णयावर विरोधी पक्षाने जोरदार टीका केली आहे.
मुंबई सेंट्रलहून सुटणारी १२९५१ मुंबई सेंट्रल-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेस आणि १२९५३ मुंबई सेंट्रल-हजरत निजामुद्दीन ऑगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या नियोजित वेळेपेक्षा पाच तास उशिराने सुटणार आहेत. पश्चिम रेल्वेने २०१५५ डॉ. आंबेडकर नगर-नवी दिल्ली, ०९३०९ इंदूर-हजरत निजामुद्दीन, १२४१५ इंदूर-नवी दिल्ली, १२२४७ वांद्रे टर्मिनस-हजरत निजामुद्दीन आणि १२९५७ साबरमती-नवी दिल्ली या पाच गाड्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे या गाड्यांचे आरक्षण केलेल्या प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे. त्यातच सीएसएमटीहून हजरत निजामुद्दीनकडे जाणारी २२२२१ क्रमांकाची राजधानी एक्स्प्रेस ९ ऑक्टोबरसाठी रद्द करण्यात आली आहे. या गाडीच्या रद्द होण्यामागील निर्णय स्वतंत्रपणे घेण्यात आला आहे. दिल्लीतील आंदोलनामुळे नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन स्थानकांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याचा अंदाज आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे मंडळाच्या सूचनेनुसार गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांनी राष्ट्रीय रेल्वे चौकशी प्रणाली (एनटीईएस), रेल्वेची हेल्पलाइन १३९ किंवा अधिकृत माहिती माध्यमांद्वारे गाड्यांची अद्ययावत स्थिती तपासून प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
केंद्र सरकारने दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या रद्द केल्या असून, दिल्लीतील मेट्रोची सेवाही स्थगित केली आहे. ही परिस्थिती आणीबाणीसारखी असून, सरकारला भारत बंद करायचा असे दिसते, ज्ञानेशकुमारला वाचवण्यासाठी हे सुरू आहे, मात्र आम्ही याविरोधात लढणार आहे.
- आदित्य ठाकरे, नेते, शिवसेना (ठाकरे गट)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.