गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याचा मार्ग मोकळा
१८० बांधकामे हटविली; १०८ रहिवाशांचे पुनर्वसन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडून वाहतुकीवरचा भार कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यामुळे बाधित होणारी १८० बांधकामे शुक्रवारी (ता. ९) पालिकेने हलविली. त्यामुळे ‘एस’ विभागाच्या हद्दीतील या जोडरस्त्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या प्रकल्पबाधितांपैकी पात्र १०८ रहिवाशांचे महापालिकेच्या वतीने पुनर्वसन करण्यात आले आहे.
गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याची लांबी १२.२० किलोमीटर आहे. या जोडरस्त्याचे काम चार टप्प्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यात रस्ता, भूमिगत बोगदा, उड्डाणपूल आदी कामांचा समावेश आहे. एस विभागाच्या हद्दीतील खिंडीपाडा सोनापूर येथील सुमारे १८० बांधकामे जोडमार्गाच्या उभारणीमुळे बाधित होणार होती. या बांधकामांचे आज निष्कासन करण्यात आले आहे. उपआयुक्त (परिमंडळ ६) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एस विभागाच्या सहाय्यक आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. महापालिकेचे ३० पेक्षा अधिक अभियंते, १०० कर्मचारी यांच्यासोबत चार पोकलेन संयंत्र, चार जेसीबी संयंत्र, १० डम्पर आदींच्या सहाय्याने ही सर्व बांधकामे हटविण्याची कारवाई करण्यात आली. ९० पोलिस कर्मचारी या वेळी तैनात होते. या कारवाईतमुळे गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याच्या रुंदीकरणाला सुरुवात करणे शक्य होणार आहे. अतिक्रमणांचे निष्कासन पूर्ण झाले असून, सध्या बांधकामाचा राडारोडा हटविण्याचे काम सुरू आहे. राडारोडा हटविल्यानंतर प्रकल्पाच्या पुढील कामांसाठी जागा वेळेत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत आहे.
पाच एकर सरकारी जमीन अतिक्रमणमुक्त
‘एसआरए’ने मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारकोप आणि मालवणी परिसरातील सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करत तब्बल पाच एकर सरकारी जमीन अतिक्रमणमुक्त केली आहे. येथे असलेल्या जवळपास ३०० ते ३५० अनधिकृत झोपड्यांचे निष्कासन करण्यात आले. या जमिनीचे मूल्य सुमारे ११३ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. ही कारवाई ५ आणि ८ ऑक्टोबर रोजी करण्यात आली. यामध्ये मौजे चारकोप, ता. बोरिवली येथील सर्व्हे क्र. ३८, नगर भूमापन क्र. ५५३ मधील एकूण नऊ एकरांपैकी चार एकर क्षेत्रावरील अतिक्रमण काढण्यात आले, तर मालवणी येथे नगर भूमापन क्र. ४ मधील एकूण १३ एकरांपैकी एक एकर क्षेत्र अतिक्रमणमुक्त केले आहे. या भागातील संबंधित शासकीय जमिनीचे एकूण क्षेत्रफळ २२ एकर असून, त्यापैकी पाच एकरचे मूल्य ११३.२५ कोटी आहे. या सरासरी प्रतिएकर मूल्याच्या आधारे उर्वरित १७ एकरसह संपूर्ण २२ एकरचे अंदाजित एकूण मूल्य ४९८.३० कोटी रुपये, म्हणजेच सुमारे ५०० कोटी रुपये इतके आहे.
बोरिवलीत ३० बांधकामांवर कारवाई
मुंबई किनारा रस्ता (उत्तर) मार्गरेषेमुळे बाधित होणाऱ्या बोरिवली येथील जोडरस्त्याच्या पश्चिम बाजूकडील ३० बांधकामे शुक्रवारी पालिकेच्या आर उत्तर विभागाच्या वतीने पाडण्यात आली. मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पालिकेने मुंबई किनारा रस्ता (उत्तर) हा महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेतला आहे. संपूर्ण मुंबईचा किनार पट्टा यामुळे एकमेकांना जोडला जाणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीचे काम विविध सात टप्प्यांमध्ये विभागण्यात आले आहे. पॅकेज ‘एफ’मध्ये ३.४७ लांबीच्या गोराई आंतरबदल ते दहिसर उन्नत मार्ग विकास कामाचा अंतर्भाव आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.