उड्डाणपुलांवर ‘क्रॅश बॅरियर’
महापालिकेची पाच कोटींची निविदा प्रसिद्ध
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील आर/मध्य विभागांतर्गत येणारा नॅशनल पार्क उड्डाणपूल आणि दत्तापाडा उड्डाणपुलावर सुरक्षिततेच्या दृष्टीने ‘डब्ल्यू-मेटल बीम क्रॅश बॅरियर’ बसवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या कामासाठी पालिकेच्या पूल विभागाने पाच कोटी ७६ लाख ७९ हजार ३० रुपयांच्या अंदाजित खर्चाची ई-निविदा सूचना प्रसिद्ध केली असून, पात्र आणि अनुभवी कंत्राटदारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत.
पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलांवर ‘डब्ल्यू-मेटल बीम क्रॅश बॅरियर’ बसवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. हे बॅरियर्स अपघाताच्या वेळी वाहनांच्या धडकेचा प्रभाव कमी करतात, ज्यामुळे वाहने पुलावरून खाली कोसळण्याचा धोका टळतो. यामुळे अपघाताची तीव्रता कमी होऊन जीवितहानी रोखण्यास मदत होईल तसेच रात्रीच्या प्रवासात हे बॅरियर्स वाहनचालकांसाठी स्पष्ट दिशादर्शक ठरतील. महापालिकेच्या वर्ग २ व त्यावरील श्रेणीतील नोंदणीकृत कंत्राटदार अथवा केंद्र व राज्य सरकार, निमसरकारी संस्थांमध्ये असाच अनुभव असलेल्या कंपन्या या निविदा प्रक्रियेत भाग घेऊ शकतील. या कामाचा कंत्राट कालावधी पावसाळ्यासह सहा महिन्यांचा निश्चित करण्यात आला असून, संयुक्त उद्यमांना यात परवानगी नाकारण्यात आली आहे. तसेच अनोंदणीकृत कंत्राटदारांना कार्यादेश मिळाल्यापासून तीन महिन्यांच्या आत नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या कामासाठी पाच लाख ७६ हजार ७९१ रुपये इसारा रक्कम ठेव निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक कंत्राटदारांना ६ ऑक्टोबरपासून निविदा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, २६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत निविदा विक्री सुरू राहील. २६ ऑक्टोबरला दुपारी ४ वाजेपर्यंत ऑनलाइन निविदा सादर करता येतील. इच्छुकांनी या निविदेची आवश्यक माहिती घेऊन वेळेत कंत्राट भरावे, असे आवाहन मुख्य अभियंता (पूल) यांनी केले आहे.
.........