मुंबई

कूपर, ट्रॉमा केअर रुग्णालयांत आरोग्य सुविधांचा विस्तार होणार!

CD

कूपर, ट्रॉमा केअर रुग्णालयांत आरोग्य सुविधांचा विस्तार होणार!
केमोथेरपी, डायलिसिस बेड्स वाढवण्यासह एनआयसीयू सुविधा सक्षम करण्यावर भर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : मुंबई महापालिकेच्या कूपर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (एचबीटी) ट्रॉमा केअर रुग्णालयांमधील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. कर्करोग रुग्णांसाठी केमोथेरपी सुविधा उपलब्ध करून देणे, मूत्रपिंडाच्या रुग्णांसाठी डायलिसिस बेड्सची संख्या वाढविणे, नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागासाठी (एनआयसीयू) आवश्यक प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करणे आणि परिचारिकांची कमतरता भरून काढणे यावर प्रशासनाचा भर राहणार आहे.
मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी शनिवारी दोन्ही रुग्णालयांना भेट देत तेथील वैद्यकीय सेवांचा आढावा घेतला. या वेळी त्यांनी डॉक्टरांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
रुग्णांना आवश्यक उपचारांसाठी अन्य ठिकाणी जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी रुग्णालयांमधील उपचार सुविधांचा विस्तार करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. केमोथेरपीची सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासह डायलिसिस उपचारांसाठी बेड्स वाढविण्याबाबतही चर्चा करण्यात आली. या सुविधांमुळे संबंधित रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यास मदत होणार असल्याचे भांदिर्गे यांनी नमूद केले.
आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी दोन्ही रुग्णालयांतील विविध विभागांच्या डॉक्टरांशी सविस्तर चर्चा केली. या वेळी डॉक्टरांनी विभागनिहाय अडचणी, दैनंदिन कामकाजातील समस्या आणि आवश्यक सुधारणांबाबत आपल्या सूचना मांडल्या. रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्राधान्याच्या प्रश्नांवर संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करून ते सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे भांदिर्गे यांनी स्पष्ट केले.
या आढावा बैठकीला नगरसेवक दीपक कोतेकर, नगरसेविका अंजली सामंत, वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. शैलेश मोहिते, कूपर व ट्रॉमा केअर रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. छाया शिंदे, तसेच दोन्ही रुग्णालयांतील विभागप्रमुख आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

नवजात बालकांच्या उपचारांसाठी एनआयसीयू सक्षम करणार
गंभीर स्थितीतील नवजात बालकांना तातडीने आणि योग्य उपचार मिळावेत, यासाठी अतिदक्षता विभागाची सुविधा महत्त्वाची आहे. या पार्श्वभूमीवर एनआयसीयूच्या निविदा प्रक्रियेला गती देऊन आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आढावा बैठकीत चर्चा झाली. याशिवाय महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेच्या अंमलबजावणीचाही आढावा घेण्यात आला.

परिचारिकांची कमतरता भरून काढण्यावर लक्ष
रुग्णालयांमधील वैद्यकीय सेवा सुरळीत राहण्यासाठी पुरेशा परिचारिका उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे परिचारिकांची कमतरता दूर करण्याचा मुद्दा बैठकीत प्राधान्याने मांडण्यात आला. त्याचबरोबर रुग्णालयांतील कँटीनमधील अन्नाचा दर्जा आणि स्वच्छता सुधारणे, जन्म-मृत्यू नोंदणीची प्रक्रिया अधिक सुलभ करणे, तसेच दिव्यांग प्रमाणपत्र मिळविताना नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर करणे, या विषयांवरही चर्चा करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीदरम्यान निवडणूक आयोगात मोठे फेरबदल; मतदारयादी विभागातील अधिकाऱ्यांची बदली

वयाच्या २६ व्या वर्षी ७५ लाखांची संपत्ती! १८ हजारांच्या पगारापासून सुरू झाला प्रवास

वयाच्या ६० व्या वर्षीही मिलिंद सोमण अनवाणी धावतात! पायांच्या स्नायूंना होतात 'हे' फायदे; पण ही काळजी घ्या

सायन रुग्णालयात डॉक्टरने जीवन संपवलं; स्वत:लाच सलाईन लावत ॲनस्थेशियाचा ओव्हरडोस घेतला, बाथरूममध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

Maharashtra Live News : सीजेपी आंदोलकांची पुण्यात धरपकड

SCROLL FOR NEXT