मुंबई

बाटल्या द्या, बिर्याणी घ्या!

CD

बाटल्या द्या, बिर्याणी घ्या!
भांडुपच्या शक्ती यादव या ‘प्लॅस्टिक मॅन’चा अभिनव उपक्रम; संस्थेमार्फत वर्षाला ५० टन प्लॅस्टिकचे पुनर्चक्रीकरण
मयूर फडके ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : घराच्या बाजूने वाहणाऱ्या नाल्यात साचणाऱ्या प्लॅस्टिकमुळे पावसाचे पाणी घराच्या दारापर्यंत येत असल्याच्या त्रासावर मात करण्यासाठी भांडुपमधील शक्ती यादव यांनी एक अभिनव उपक्रम सुरू केला. त्याअंतर्गत त्यांनी प्लॅस्टिकच्या बाटल्यांच्या बदल्यात रेशन आणि बिर्याणी देणे सुरू केले व प्लॅस्टिक संकलनाला प्रोत्साहन दिले आहे. या उपक्रमामुळे यादव यांची ओळख ‘प्लॅस्टिक मॅन’ अशी झाली असून, त्यांच्या ‘बाय फूड विथ प्लॅस्टिक इंडिया’ या संस्थेमार्फत दरवर्षी सुमारे ५० टन प्लॅस्टिकचे पुनर्चक्रीकरण केले जाते.
कोरोनाकाळात २०२० मध्ये शक्ती यांनी या उपक्रमाचा श्रीगणेशा केला. पावसाळ्यात घराच्या दारापर्यंत येणाऱ्या नाल्याच्या पाण्यात प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि पिशव्यांचा मोठ्या प्रमाणात साठा असल्याचे लक्षात आले. प्लॅस्टिकमुळे पाण्याचा प्रवाह अडत असल्याचे जाणवल्यानंतर त्यांनी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची खिल्ली उडविण्यात आली.
त्याच वेळी अमेरिकेतील एका व्यक्तीने प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर पाहिल्यानंतर शक्ती यांना प्रेरणा मिळाली. टाळेबंदीमुळे अनेकांचे रोजगार गेले होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी ‘प्लॅस्टिकच्या बाटल्या आणा आणि रेशन घेऊन जा’ हा अभिनव उपक्रम सुरू केला. शंभरहून अधिक नागरिकांनी त्याला प्रतिसादही दिला. जमा झालेल्या बाटल्यांच्या पुनर्चक्रीकरणासाठी त्यांनी बिसलेरीच्या ‘बॉटल्स फॉर चेंज’ उपक्रमाशी संपर्क साधला.
२०२१ मध्ये त्यांनी बाटल्यांच्या बदल्यात बिर्याणी देण्यास सुरुवात केली. भांडुप, नाहूर, कांजूर आणि ठाणे परिसरातून नागरिकांसह मुलांचाही सहभाग वाढला, मात्र केवळ खाद्यपदार्थांसाठी बाटल्या जमा करण्यापेक्षा प्लॅस्टिकच्या दुष्परिणामांची जाणीव मुलांना व्हावी, यासाठी त्यांनी प्रबोधनावर भर दिला. दरम्यान, शक्ती यांनी पदवी आणि एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. कॅम्पसमधून चांगल्या नोकरीची संधी मिळूनही त्यांनी समाजासाठी काम करण्याचा निर्णय घेतला. स्वित्झर्लंडमधील संस्थेकडून प्लॅस्टिक पुनर्चक्रीकरणाचे ज्ञान घेतल्यानंतर त्यांनी स्वतःची संस्था सुरू केली. निधीअभावी काही काळ काम थांबले. त्याच वेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या टाटा ग्रुपच्या ‘गुडफेलो’ संस्थेत नोकरी केल्यानंतर एका संस्थेमार्फत फेलोशिपसाठी जर्मनीला गेले. तेथील अनुभवाच्या बळावर मुंबईत परतून त्यांनी उपक्रमाला नव्याने सुरुवात केली.

प्लॅस्टिकपासून उपयुक्त वस्तू
सध्या त्यांच्या संस्थेमार्फत महिन्याला तीन ते चार टन प्लॅस्टिकचे पुनर्चक्रीकरण केले जाते. त्यापासून लॅपटॉप स्टँड, टी-कोस्टर, ब्रेसलेट आणि अन्य वस्तू तयार करून विकल्या जातात. परदेशातील अनेक संस्था त्यांच्याशी जोडल्या आहेत. मुंबईतील ५० शाळांमध्ये मोठ्या बाटलीच्या आकारातील प्लॅस्टिक कचरापेट्या देण्यात आल्या असून, आणखी २५० शाळांनी अशा पेट्यांची मागणी केली आहे.

बाटल्यांच्या बदल्यात जीवनावश्यक वस्तू
सध्या २० बाटल्यांच्या बदल्यात एका व्यक्तीला बिर्याणी दिली जाते. आता नव्या उपक्रमांतर्गत २१२ बाटल्यांच्या बदल्यात एक लिटर तेल, १२५ बाटल्यांच्या बदल्यात एक किलो तांदूळ, तर ७४ बाटल्यांच्या बदल्यात दोन मोठ्या नोट बुक देण्याचा स्तुत्य उपक्रम संस्था चालवते. भविष्यात प्लॅस्टिकच्या बाटल्यांच्या बदल्यात सॅनिटरी पॅड देण्याचाही त्यांचा मानस आहे.

हॉटेल सुरू करण्याचे स्वप्न
दादरमध्ये प्लॅस्टिकच्या बाटल्यांच्या बदल्यात जेवण देणारे हॉटेल सुरू करणे आणि त्यामागे स्वतंत्र पुनर्चक्रीकरण कारखाना उभारणे, हे शक्ती यांचे स्वप्न आहे. प्लॅस्टिकला संसाधन म्हणून पाहण्याची सवय नागरिकांना लागावी आणि मुंबईसह देश प्लॅस्टिकमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करावी, हा त्यांच्या उपक्रमामागील उद्देश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीदरम्यान निवडणूक आयोगात मोठे फेरबदल; मतदारयादी विभागातील अधिकाऱ्यांची बदली

वयाच्या २६ व्या वर्षी ७५ लाखांची संपत्ती! १८ हजारांच्या पगारापासून सुरू झाला प्रवास

वयाच्या ६० व्या वर्षीही मिलिंद सोमण अनवाणी धावतात! पायांच्या स्नायूंना होतात 'हे' फायदे; पण ही काळजी घ्या

सायन रुग्णालयात डॉक्टरने जीवन संपवलं; स्वत:लाच सलाईन लावत ॲनस्थेशियाचा ओव्हरडोस घेतला, बाथरूममध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

Maharashtra Live News : सीजेपी आंदोलकांची पुण्यात धरपकड

SCROLL FOR NEXT