सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : नवजात बालकांमधील जन्मजात श्रवणदोषाचे वेळीच निदान करण्यापासून ते प्रौढ रुग्णांच्या श्रवण समस्यांचे नेमके कारण शोधण्यापर्यंत आता कूपर रुग्णालयातील कान-नाक-घसा विभागाची क्षमता वाढली आहे. विभागात अत्याधुनिक श्रवण तपासणी उपकरणे दाखल झाल्याने रुग्णांच्या श्रवणक्षमतेचे अधिक अचूक मूल्यमापन करता येणार आहे. विशेष म्हणजे, श्रवणदोषाचे स्वरूप आणि त्याची तीव्रता निश्चित करण्याबरोबरच दिव्यांगत्व प्रमाणपत्रांच्या वैद्यकीय पडताळणीतही या उपकरणांचा उपयोग होणार आहे.
कूपर रुग्णालयाच्या कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ. निनाद गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी विभागात प्युअर टोन ऑडिओमेट्रीसारख्या नियमित तपासण्यांच्या माध्यमातून रुग्णांच्या श्रवणक्षमतेचे परीक्षण केले जात होते. आता नव्या तंत्रज्ञानामुळे श्रवणदोषाचे अधिक सखोल विश्लेषण करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. ही उपकरणे रुग्णालयात आल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून त्यांचा वापर सुरू करण्यात आला असून, आवश्यक व्यवस्था पूर्ण करून नियमित तपासण्या केल्या जात आहेत. या सुविधेसाठी दानशूर व्यक्तींसह रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सिकोस्ट यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले आहे.
दिव्यांगत्व प्रमाणपत्रांच्या पडताळणीला आधार
श्रवणदोषाच्या आधारे दिव्यांगत्व प्रमाणपत्रासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तींच्या वैद्यकीय तपासणीतही या उपकरणांची मदत होऊ शकते. संबंधित व्यक्तीची श्रवणक्षमता किती आहे आणि श्रवणदोषाची तीव्रता किती आहे, याचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यासाठी या चाचण्या उपयुक्त ठरतात. त्यामुळे प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत वैद्यकीय निष्कर्ष अधिक स्पष्ट होण्यास मदत मिळू शकते, मात्र प्रमाणपत्राबाबतचा अंतिम निर्णय लागू नियम आणि अधिकृत वैद्यकीय मूल्यमापनानुसार घेतला जातो.
दररोज १०० ते २०० रुग्णांची तपासणी
कूपर रुग्णालयाच्या ईएनटी विभागात आठवड्यातून तीन दिवस बाह्यरुग्ण विभाग सुरू असतो. येथे दररोज सुमारे १०० ते २०० रुग्ण उपचारांसाठी येतात. या सर्व रुग्णांना श्रवणक्षमतेची तपासणी आवश्यक नसते. रुग्णांची लक्षणे, तक्रारी आणि वैद्यकीय गरज लक्षात घेऊन संबंधित चाचण्या करण्याचा निर्णय घेतला जातो. विभागात एक कायमस्वरूपी आणि एक स्वयंसेवी ऑडिओलॉजिस्ट कार्यरत असून, त्यांच्या मदतीने रुग्णांच्या श्रवणक्षमतेचे मूल्यमापन केले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.