उपचारांत जनुकीय चाचण्यांना महत्त्व
स्त्री कर्करोगाबाबत ‘टाटा’मध्ये तज्ज्ञांची चर्चा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : स्त्री कर्करोगाच्या उपचारांत सर्व रुग्णांना एकाच पद्धतीने उपचार देण्याऐवजी कर्करोगाचे स्वरूप, त्यातील जनुकीय बदल आणि आजाराची अवस्था लक्षात घेऊन उपचार निश्चित करण्याकडे वैद्यकीय क्षेत्राचा कल वाढत आहे. विशेषतः अंडाशय, गर्भाशयमुख आणि गर्भाशयाच्या कर्करोगात जनुकीय चाचण्या, लक्ष्यित औषधोपचार आणि रोगप्रतिकारक यंत्रणेवर आधारित उपचारांचे महत्त्व अधोरेखित होत आहे. या उपचारपद्धतींचा प्रत्यक्ष रुग्णसेवेत वापर कसा करावा यावर टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या वुमेन्स कॅन्सर इनिशिएटिव्हच्या २४व्या वार्षिक परिषदेत चर्चा केली गेली.
८ ते ११ ऑक्टोबरदरम्यान मुंबईत आयोजित या परिषदेत भारतीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. ‘स्त्री कर्करोग : वैज्ञानिक पुरावे आणि प्रत्यक्ष उपचार’ या संकल्पनेतून संशोधनातील निष्कर्ष आणि प्रत्यक्ष उपचारपद्धती यांच्यातील दुवा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अंडाशयाच्या कर्करोगात काही विशिष्ट जनुकीय बदलांची तपासणी केल्यास आनुवंशिक धोका समजण्याबरोबरच काही रुग्णांसाठी योग्य औषधोपचार निवडण्यास मदत होऊ शकते. पीएआरपी इनहिबिटर या लक्ष्यित औषधांचा वापर, त्यांचे संभाव्य फायदे आणि उपचारांनंतर आजार पुन्हा उद्भवल्यास उपलब्ध पर्याय यांचाही तज्ज्ञांकडून आढावा घेतला जात आहे, मात्र जनुकीय चाचणी केली म्हणजे प्रत्येक रुग्णाला लक्ष्यित औषधे देता येतात असे नाही. चाचणीचे निष्कर्ष, कर्करोगाचा प्रकार, आजाराची अवस्था आणि रुग्णाची एकूण प्रकृती यांचा विचार करूनच उपचार निश्चित करावे लागतात. त्यामुळे आधुनिक चाचण्यांची उपलब्धता वाढवण्याबरोबरच त्यांचा योग्य वापर करणेही महत्त्वाचे ठरते. परिषदेत प्रगत शस्त्रक्रिया तंत्रांसह रेडिओथेरपी आणि ब्रॅकीथेरपीच्या आधुनिक पद्धतींवर कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या. गर्भाशयमुखाच्या कर्करोगासह काही कर्करोगांमध्ये इम्युनोथेरपीचा वापर कोणत्या परिस्थितीत करता येतो, यावरही चर्चा झाली. परिषदेत प्रा. जोनाथन लेडरमन यांचे पद्मश्री डॉ. केतायुन दिनशॉ स्मृती व्याख्यानही आयोजित करण्यात आले.
...
उपचारांनंतरच्या आयुष्याचाही विचार
कर्करोगावरील उपचारांचा विचार करताना केवळ आजारावर नियंत्रण मिळवणे पुरेसे नसते. उपचारांमुळे प्रजननक्षमतेवर होणारा परिणाम, उपचारांनंतरचे पुनर्वसन आणि दैनंदिन जीवनावर होणारे परिणाम यांचाही विचार करावा लागतो. रुग्णांचे जीवनमान सुधारण्यासाठी उपचारांनंतरची देखभाल, मानसिक आधार आणि दीर्घकालीन पाठपुराव्याची गरजही परिषदेत चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. संशोधनातून उपलब्ध झालेली माहिती प्रत्यक्ष रुग्णसेवेत आणताना रुग्णाच्या गरजांना प्राधान्य देण्यावर तज्ज्ञांचा भर आहे.
...
देशातील रुग्णसंख्येचे आव्हान
ग्लोबोकॅन २०२४ च्या अंदाजानुसार, भारतात गर्भाशयमुख, अंडाशय आणि गर्भाशयाच्या कर्करोगांचे मिळून वर्षभरात दीड लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे वेळेत निदान होणे, योग्य उपचारांची निवड आणि तज्ज्ञ वैद्यकीय सेवांपर्यंत पोहोच मिळणे ही आव्हाने कायम आहेत.