वरळी कोळीवाडा समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी पालिकेकडून ३.१५ कोटींचा खर्च
दोन वर्षांसाठी कंत्राटदाराची नियुक्ती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : वरळी कोळीवाडा समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता आणि टापटीप राखण्यासाठी महापालिकेने मोठे पाऊल उचलले आहे. पुढील दोन वर्षांच्या कालावधीत या किनाऱ्याची नियमित स्वच्छता, कचरा संकलन आणि त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी ‘मे. लक्ष्य एंटरप्रायझेस’ या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकल्पासाठी पालिका प्रशासनाकडून सुमारे तीन कोटी १५ लाख ५७ हजार रुपयांचा खर्च केला जाणार असून, अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर करण्यात आला आहे. महापालिकेच्या जी/दक्षिण विभागांतर्गत येणारा वरळी कोळीवाडा समुद्रकिनारा हा मुख्यत्वे पारंपरिक मासेमारी व्यवसायासाठी वापरला जातो. त्याचबरोबर ऐतिहासिक व निसर्गरम्य परिसर असल्याने येथे पर्यटकांचीही सातत्याने गर्दी असते. सुमारे ३.५ किलोमीटर लांबी आणि ३०० मीटर रुंदी असलेल्या या किनाऱ्यावर समुद्राच्या लाटांमुळे मोठ्या प्रमाणात तरंगता कचरा, गाळ, माती व डेब्रिज जमा होतो.
किनाऱ्यावरील हा साचलेला कचरा साफ करण्यासाठी केवळ पारंपरिक पद्धत न वापरता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली जाणार आहे. यासाठी मनुष्यबळासोबतच ‘स्कीड स्टीयर लोडर मशीन’चा वापर केला जाईल, तर कचऱ्याची अंतर्गत वाहतूक करण्यासाठी ई-ऑटो वाहने वापरली जातील.संकलित केलेला कचरा पुढील विल्हेवाटीसाठी पालिकेच्या अधिकृत क्षेपणभूमीवर वाहून नेला जाईल.
पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने काढलेल्या निविदेत तीन कंपन्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी ‘मे. लक्ष्य एंटरप्रायझेस’ यांची निविदा सर्वात कमी दराची ठरली. पालिका प्रशासनासोबत झालेल्या वाटाघाटींनंतर कंत्राटदाराने पहिल्या वर्षासाठी दररोज ४०,५५३.४७,दुसऱ्या वर्षासाठी दररोज ४२,५८१.१४ या दराने काम करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यानुसार दोन वर्षांचे मूळ कंत्राट मूल्य तीन कोटी तीन लाख ४४ हजार १३२ रुपये असून, चार टक्के सादिलवार खर्चासह एकूण कंत्राट मूल्य तीन कोटी १५ लाख ५७ हजार ८९७ रुपयांवर पोहोचले आहे. स्थायी समितीच्या मान्यतेनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.