शिवाजी पार्कमध्ये दुर्गापूजेचा उत्सवी थाट
प्रदूषण, जंगलतोड, अनियंत्रित विकासावर भाष्य
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : शिवाजी पार्क येथील बंगाल क्लबतर्फे यंदा ९१व्या दुर्गापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ते २१ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या या उत्सवासाठी सुमारे १० हजार चौरस फुटांचा भव्य मंडप उभारण्यात येत आहे.
यंदा ‘प्रकृती शक्ती - निसर्गाची शक्ती’ ही संकल्पना साकारण्यात येणार असून, निसर्गाचे महत्त्व, पर्यावरण संवर्धन आणि नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर मानवी जबाबदारीचा संदेश या माध्यमातून देण्यात येणार आहे. उत्सवाच्या सात दिवसांत मुंबई आणि परिसरातून सुमारे आठ ते नऊ लाख भाविक भेट देतील, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
मुंबईतील सर्वांत जुन्या बंगाली संस्थांपैकी एक असलेल्या बंगाल क्लबला यंदा स्थापनेची १०४ वर्षे पूर्ण होत आहेत. अलीकडेच नेपाळ आणि हिमालयीन प्रदेशात झालेल्या नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दुर्गापूजेची संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. निसर्ग मानवाला जीवन देतो, त्याचे पालनपोषण करतो; मात्र त्याची शक्ती मानवी नियंत्रणापलीकडे आहे, हा विचार ‘प्रकृती शक्ती’च्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे. भूकंप, पूर आणि भूस्खलन यांसारख्या आपत्तींच्या पार्श्वभूमीवर आपत्तीपूर्व तयारी, पर्यावरणीय जबाबदारी आणि संकटग्रस्तांप्रती सहानुभूती यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात येणार आहे.
महिषासुराच्या प्रतीकातून निसर्गाचा समतोल बिघडवणाऱ्या आधुनिक प्रवृत्तींवर भाष्य करण्यात येणार आहे. प्रदूषण, जंगलतोड, कचरा, अतिवापर आणि अनियंत्रित विकास यांसारख्या समस्यांवर मात करण्याचा संदेश मंडपाच्या रचनेतून दिला जाईल. देवी दुर्गेच्या १० हातांच्या माध्यमातून नकार देणे, वापर कमी करणे, पुनर्वापर, दुरुस्ती, पुनर्चक्रण, पर्यावरणाची पुनर्बांधणी, संवर्धन, वाटून घेणे, शिक्षण आणि निसर्गाचे पुनरुज्जीवन या १० पर्यावरणपूरक संकल्पना मांडण्यात येणार आहेत. देवीची शस्त्रे ज्ञान, धैर्य, सहकार्य, आपत्तीपूर्व तयारी आणि जबाबदार तंत्रज्ञानाचे प्रतीक असतील.
बॉलीवूडमधील कला दिग्दर्शक रूपिन सूचक यांच्याकडे मंडपाच्या रचनेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. चित्रपट, जाहिराती आणि विविध कलात्मक अवकाशांच्या निर्मितीचा दोन दशकांहून अधिक अनुभव असलेल्या सूचक यांनी बंगाली संस्कृती, पारंपरिक कलाकुसर आणि निसर्ग यांचा संगम साधण्यावर भर दिला आहे. मंडपाची रचना तीन टप्प्यांत अनुभवता येणार आहे. पहिल्या टप्प्यात पर्यावरणाची हानी, प्रदूषण आणि अनियंत्रित विकासाचे परिणाम दाखवण्यात येतील. दुसऱ्या टप्प्यात कचरा आणि अव्यवस्थेतून नैसर्गिक साहित्य, पर्यावरणीय जाणीव आणि सामूहिक जबाबदारीकडे होणारे परिवर्तन मांडले जाईल. तिसऱ्या टप्प्यात देवी दुर्गेचे ‘प्रकृती शक्ती’च्या रूपातील दर्शन घडवून निसर्गाचा समतोल आणि नव्या सुरुवातीचा संदेश दिला जाईल.
नृत्य, संगीताचे कार्यक्रम
दुर्गापूजेतील पारंपरिक धार्मिक विधी, कुमारीपूजा, भोगप्रसाद आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम हे उत्सवाचे प्रमुख आकर्षण असतील. दररोज सकाळी बंगाल क्लबच्या सदस्यांकडून नृत्य आणि संगीताचे कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. याशिवाय नृत्याविष्कार, संगीत, चित्रकला आणि ओरिगामी कार्यशाळा, नृत्यस्पर्धा तसेच गरबा आणि दांडियाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. मंडपाशेजारील परिसरात हस्तकला प्रदर्शन आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल असतील. त्यामुळे मुंबईतच बंगालमधील खाद्यसंस्कृती, कला, संगीत आणि उत्सवी वातावरणाचा अनुभव भाविकांना घेता येणार आहे.
सुरक्षेची विशेष व्यवस्था
भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने मंडप परिसरात सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. धातूशोधक यंत्रे, तपासणी व्यवस्था आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून देखरेख ठेवण्यात येईल. परिसरात सुमारे ३० ते ६० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन असल्याचे आयोजकांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.