समुद्राच्या स्वच्छतेसाठी आणखी दोन बोटी
ससून डॉक, जमशेदजी बंदरातील तरंगता कचरा हटवण्यासाठी ३.६४ कोटींची तरतूद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ ः ससून डॉक आणि जमशेदजी बंदर परिसरातील समुद्रातील तरंगता कचरा यांत्रिक पद्धतीने हटवण्यासाठी आणखी दोन मानवरहित बोटींचा पुरवठा, संचालन आणि देखभाल करण्यास पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी मंजुरी दिली आहे.
मुंबईतील प्रमुख बंदर परिसरातील प्लॅस्टिक आणि प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिका आणि बंदर प्राधिकरणांकडून सुरू असलेल्या पर्यावरण स्वच्छता मोहिमेअंतर्गत या प्रकल्पासाठी पालिकेने ३.६४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. स्वयंचलित दूरस्थ पद्धतीने नियंत्रित करता येणाऱ्या विद्युत आणि सौरऊर्जेवर चालणाऱ्या बोटींच्या माध्यमातून समुद्रातील तरंगता कचरा हटविण्यात येणार आहे.
पालिकेने याच वर्षी मे महिन्यात गेटवे ऑफ इंडिया आणि बधवार पार्क येथे दोन मानवरहित विद्युत बोटी तैनात केल्या होत्या. बोटींच्या माध्यमातून दररोज सुमारे ८० ते ९० किलो तरंगता कचरा गोळा केला जात असल्याची माहिती कुलाबा येथील भाजपचे नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी दिली.
या प्रकल्पाला महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची मंजुरी मिळाली असून, अर्थसंकल्पातही त्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग निविदेच्या अटी व शर्ती निश्चित करण्याचे काम करीत असून, लवकरच निविदा काढण्यात येईल, असे नार्वेकर यांनी सांगितले.
मुंबईची किनारपट्टी आणि लगतच्या परिसराची स्वच्छता राखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारी मुंबई महापालिका ही देशातील पहिली महानगरपालिका ठरली आहे. या बोटींच्या माध्यमातून दररोज सुमारे ८० ते ९० किलो तरंगता कचरा गोळा केला जात आहे. मुंबईतील स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी महापालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांचा हा एक भाग आहे.
कचऱ्यावर होणार पुनर्वापर
मनुष्यबळाच्या माध्यमातून कचरा गोळा करण्यास अधिक वेळ लागतो. त्यामुळे या मानवरहित वाहनाचा वापर केला जातो. समुद्रकिनारी आढळणारा कचरा गोळा करून त्याचे वर्गीकरण केले जाते आणि त्यानंतर पुनर्वापरासाठी पाठविण्यात येतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.