पाणबुड्यांचा वेध घेणारी युद्धनौका नौदलात
मुंबईच्या सागरी सुरक्षेला स्वदेशी ‘मंगरोल’चे बळ!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : समुद्रातील पाणबुड्यांचा शोध घेऊन संभाव्य धोका रोखण्यासाठी भारतीय नौदलाला नवे सामर्थ्य मिळाले आहे. अत्याधुनिक सोनार, टॉर्पेडो आणि स्वदेशी पाणबुडीविरोधी यंत्रणांनी सज्ज असलेल्या ‘आयएनएस मंगरोल’ या युद्धनौकेचा सोमवारी नौदलाच्या ताफ्यात समावेश करण्यात आला. उथळ समुद्रातील मोहिमांसाठी विशेषतः तयार केलेल्या या युद्धनौकेच्या बांधणीत ८० टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्रीचा वापर करण्यात आला आहे. यामुळे नौदल सुरक्षा अधिक बळकट होणार आहे.
पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख व्हाइस ॲडमिरल संजय वत्सायन यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील नौदल गोदीत हा सोहळा पार पडला. या वेळी नौदल आणि संरक्षण क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी, संरक्षण मंत्रालयाचे प्रतिनिधी तसेच स्वदेशी शस्त्रास्त्रे आणि संवेदक प्रणालींच्या निर्मितीशी संबंधित प्रतिनिधी उपस्थित होते. ‘आयएनएस मंगरोल’मध्ये पाण्याखालील पाणबुड्यांचा माग काढण्यासाठी ‘अभय’ ही जहाजाच्या तळाशी बसवलेली सोनार प्रणाली आहे. याशिवाय हलकी टॉर्पेडो, स्वदेशी पाणबुडीविरोधी रॉकेट प्रक्षेपक आणि ‘मारीच’ ही प्रगत टॉर्पेडो-विचलन प्रणाली बसविण्यात आली आहे. या यंत्रणांच्या मदतीने पाण्याखालील संभाव्य धोक्यांचा शोध घेऊन त्यांना प्रत्युत्तर देणे शक्य होणार आहे. किनारपट्टीजवळील कमी खोलीच्या समुद्रात मोठ्या युद्धनौकांच्या हालचालींवर मर्यादा येतात. अशा भागांत प्रभावीपणे काम करण्यासाठी ‘मंगरोल’ची रचना करण्यात आली आहे. तीन डिझेल इंजिने आणि वॉटरजेट प्रणोदन प्रणालीमुळे ही युद्धनौका उथळ पाण्यातही वेगाने हालचाल करू शकते. पाणबुडीविरोधी मोहिमांसह किनारपट्टीजवळील सागरी गस्तीसाठी तिची क्षमता उपयुक्त ठरणार आहे.
जुन्या ‘मंगरोल’चा वारसा पुढे
गुजरातमधील जुनागढ जिल्ह्यातील मंगरोल या किनारी शहराच्या नावावरून या युद्धनौकेला नाव देण्यात आले आहे. ती जुन्या ‘आयएनएस मंगरोल’ (एम-८५) या सुरुंगशोधक युद्धनौकेचा वारसा पुढे नेत आहे. या जुन्या युद्धनौकेने ७ एप्रिल २००४ पर्यंत भारतीय नौदलात सेवा बजावली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.