‘लडेंगे और जितेंगे भी...’
जेन-झीच्या आंदोलनाचा जोर कायम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार आणि भाजप सरकारच्या विरोधात आज दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर तुफान गर्दी लोटली. मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोरील चौकात जेन-झी, तरुणांच्या विविध संघटना आणि डाव्या विचारसरणीच्या संघटनांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली. ‘लडेंगे... जितेंगे भी...’ या बुलंद घोषणांनी संपूर्ण शिवाजी पार्क परिसर दणाणून सोडला.
काल पोलिसांनी जेन-झी आंदोलकांना आंदोलनात जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्याने तरुणवर्गात अधिकच संताप पाहायला मिळाला. त्याचा निषेध म्हणून आज एकाबाजूने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि दुसऱ्या बाजूने मनसेच्या वतीनेही शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. त्यामुळे आंदोलन करणाऱ्या जेन-झीचा उत्साह आणखी वाढला. लडेंगे और जितेंगे भी.... वोट चोर, गद्दी छोड...देश के गद्दार कहा मिलेंगे, बीजेपी के ऑफिस में.... इत्यादी घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
या आंदोलनात सहभागी झालेल्या तरुण चेहऱ्यांनी सरकारविरोधात तीव्र रोष व्यक्त केला. आंदोलनात सहभागी झालेल्या आदर्श सुळे या तरुणाने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, ‘लोकशाहीचे लचके तोडण्याचे काम सुरू आहे. आमचा आवाज दाबण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी तरुण मागे हटणार नाही. न्यायासाठीचा हा लढा आता अंतिम टप्प्यापर्यंत नेणार आहोत.’ तर शहानवाज आलम यांनी सरकारवर तोफ डागत सांगितले की, ‘निवडणूक आयोग आणि सरकारची मिलीभगत आता उघडी पडली आहे. संविधानाचे रक्षण करण्यासाठी तरुणाई रस्त्यावर उतरली आहे, जोपर्यंत हक्क मिळत नाही, तोपर्यंत माघार नाही.’
-----
मतचाेरीचा हिशेब द्यावाच लागेल
‘आजची ही गर्दी केवळ एका पक्षाची नसून देशाच्या भविष्यासाठी चिंतेत असलेल्या प्रत्येक तरुणाची आहे. आमच्या मतांच्या चोरीचा हिशेब सरकारला द्यावाच लागेल, असे उजमा हिने सांगितले. प्राची सिंग हिने पोलिसांचा निषेध करत ‘पोलिसांचा वापर करून विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपले जात आहे, पण हुकूमशाहीविरोधातील आम्हा तरुणांचा लढा आता थांबणार नाही, आम्ही लढणार आणि जिंकणारही.’ प्रदीप गोतरने सांगितले की, ‘देशात सरकारकडूनच अराजकता माजवली जात असून, प्रत्येक यंत्रणेचा गैरवापर होतोय. या अन्यायाविरुद्धचा हा एल्गार संपूर्ण देशात पेटल्याशिवाय राहणार नाही.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.