पाणी बचतीसाठी
पालिकेचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : एल निनो’आणि ‘हवामानविषयक घटकांच्या प्रभावामुळे यंदा कमी पाऊस झाल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांतील पाणीसाठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील उपलब्ध जलसाठा अधिक काळ टिकवून ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
पालिका प्रशासनाने पाणी बचतीसाठी विविध उपाययोजना आखल्या आहेत. घरातील नळ विनाकारण सुरू ठेवू नयेत, नळ किंवा जलवाहिन्यांमधून होणारी पाण्याची गळती तातडीने दुरुस्त करून घ्यावी, वाहनांची व परिसराची स्वच्छता करताना पाण्याचा अनावश्यक वापर टाळावा, तसेच शक्य तेथे पर्यायी जलस्रोतांचा वापर करावा. गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक आस्थापना, शैक्षणिक संस्था आणि इतर सार्वजनिक ठिकाणीही पाणी बचतीच्या उपाययोजनांना प्राधान्य द्यावे. प्रत्येक नागरिकाने पाण्याचा जपून वापर केल्यास उपलब्ध जलसाठा अधिक काळ टिकवून ठेवण्यास मदत होईल, असे आवाहन पालिकेने केले आहे.
पाण्याची बचत ही केवळ राज्य शासन किंवा महापालिकेची जबाबदारी नसून, ती प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. प्रत्येकाने दररोज थोडेसे पाणी वाचवले, तरी संपूर्ण महानगराच्या पाणी बचतीमध्ये मोठे योगदान मिळू शकते. पाण्याचा अपव्यय टाळणे, उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे आणि पाणी बचतीसाठी इतरांनाही प्रोत्साहित करणे, या छोट्या-छोट्या कृतींमधून आपण मोठा बदल घडवू शकतो. म्हणूनच, सर्व मुंबईकर नागरिकांनी पाण्याचे महत्त्व ओळखून पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि पाणी बचतीचा संकल्प करावा, असे नम्र आवाहन करण्यात येत आहे.
उपाययोजना
-- नागरिक, औद्योगिक व व्यापारी आस्थापना तसेच विविध संस्थांनी पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळावा.
-- जलतरण तलावांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये.
-- विहिरी, कूपनलिका, विंधन विहिरी यांचा जास्तीत जास्त वापर करावा.
-- औद्योगिक व व्यापारी आस्थापना आणि स्पोर्ट्स क्लबना होणाऱ्या पाणीपुरवठ्यातील २० टक्के कपात सुरू राहणार.
-- रस्ते धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याऐवजी सांडपाणी प्रक्रिया केंद्रांमधील प्रक्रियायुक्त शुद्ध पाणी किंवा बोअरवेलच्या पाण्याचा वापर करावा.
-- बांधकामाच्या ठिकाणी पिण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्रांमधील प्रक्रियायुक्त शुद्ध पाणी किंवा बोअरवेलच्या पाण्याचा वापर करावा.
-- वाहने धुणे, उद्यानांमधील झाडांना पाणी घालणे आणि रस्ते अथवा परिसर स्वच्छ करण्यासाठी विहिरी, कूपनलिका व बोअरवेलच्या पाण्याचा वापर करावा.
-- सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि प्रसाधनगृहांचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांनीही शक्य तितक्या प्रमाणात पर्यायी जलस्रोतांचा वापर करावा.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.