‘एसआरए’त जातायत तर
उन्हात उभा राहण्याची तयारी ठेवा
प्रवेश पासची ऑनलाइन सुविधा; पण कमी नेटवर्कमुळे होतोय खोळंबा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) कार्यालयात आपल्या कामानिमित्त जाण्याचा विचार करीत असाल तर रखरखीत उन्हात उभा राहण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. एसआरए कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना ऑनलाइन एन्ट्री करून प्रवेश दिला जातो. ही यंत्रणा चांगली असली तरी ए विंगच्या प्रवेशद्वारावर अनेकदा कमी नेटवर्कमुळे किंवा ओटीपीचा मेसेज येण्यास वेळ लागत असल्याने नागरिकांना उन्हात ताटकळत उभा राहावे लागत असल्याने लांब रांगा लागतात. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
वांद्रे पूर्वेला असलेल्या एसआरए कार्यालयात दररोज शेकडो नागरिक आपल्या वेगवेगळ्या कामानिमित्त येतात. प्रवेशद्वारावर त्यांची ऑनलाइन माहिती घेऊन प्रवेश दिला जातो. त्यासाठी सुरक्षा रक्षकाकडे असलेल्या टॅबवर आलेल्या व्यक्तीचे नाव, मोबाईल नंबर भरला जातो. ही माहिती सबमिट केल्यानंतर संबंधित नागरिकांच्या मोबाइलवर ओटीपीचा मेसेज जातो. तो ओटीपी सांगितल्यानंतर प्रवेश अधिकृत होऊ आत जाता येते. मात्र ए विंगच्या प्रवेशद्वारावर अनेकदा कमी नेटवर्क असल्याने नागरिकांची माहिती भरण्यास विलंब होतो. ओटीपी न आल्याने ताटकळत थांबावे लागत असल्याने भरउन्हात नागरिकांना रांग लावून उभा राहावे लागते. याबाबत एसआरएकडे विचारणा केली असता सर्व गेटवरील प्रवेश यंत्रणा सुरळीत सुरू असून, नागरिकांना ओटीपीचा मेसेज व्यवस्थित येत असल्याचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.