नवीन वर्षात महामार्गांवर
हवाई रुग्णवाहिका सेवा
गोल्डन अवरमध्ये अपघातग्रस्तांना तातडीचे उपचार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : राज्यातील महामार्गांवर होणाऱ्या गंभीर रस्ते अपघातांतील जखमींना वेळेत वैद्यकीय उपचार मिळावेत आणि त्यांचे प्राण वाचविण्यास मदत व्हावी, या उद्देशाने हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. अपघातानंतरचा पहिला तास म्हणजेच गोल्डन अवर हा जखमींच्या उपचारांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. या निर्णायक काळात जखमींना तातडीने ट्रॉमा केअर सेंटरपर्यंत पोहोचविण्यासाठी हवाई रुग्णवाहिका सेवा प्रभावी ठरू शकते, अशी भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडली.
या अनुषंगाने आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, गृहराज्यमंत्री योगेश कदम, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, आरोग्य विभागाचे संचालक संजय काटकर, वाहतूक पोलिस विभागाचे अधीक्षक डॉ. सुनील भारद्वाज यांच्यासह मोटार परिवहन विभाग, आरोग्य विभाग आणि पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या प्रकल्पासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत प्रमाणित कार्यपद्धती तयार करून तिला मंजुरी घेण्याचे नियोजन आहे. त्यानंतर नोव्हेंबरअखेर उच्चाधिकार समितीची मंजुरी घेऊन निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेनंतर नवीन वर्षाच्या सुरुवातीला हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
राज्यात दरवर्षी सुमारे १५ हजार रस्ते अपघात होत असल्याची माहिती आहे. यापैकी अनेक अपघातांमध्ये जखमींना वेळेत उपचार मिळणे मोठे आव्हान ठरते. विशेषतः महामार्गांवरील गंभीर अपघात, वाहतूक कोंडी, रुग्णालयापर्यंतचे अंतर आणि आपत्कालीन वैद्यकीय सुविधांची उपलब्धता या बाबी लक्षात घेता, अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळण्यासाठी अधिक सक्षम यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे.
==
परिवहन, आरोग्य आणि पोलिस विभागांचा समन्वय
हवाई रुग्णवाहिका सेवेसह अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळण्यासाठी परिवहन विभाग, आरोग्य विभाग आणि पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्यात येणार आहे. यासाठी ट्रॉमा केअर सेंटरचे जाळे निश्चित करणे, सेवा पुरवठादारांचे पॅनेल तयार करणे, रस्ता सुरक्षा निधीतून आवश्यक आर्थिक तरतूद करणे आणि आपत्कालीन प्रतिसादासाठी प्रमाणित कार्यपद्धती विकसित करणे, अशा उपाययोजनांवर भर दिला जाणार आहे.
===
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.