४० हजार विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी
‘बाल दृष्टी’ उपक्रमांतर्गत तीन लाख विद्यार्थ्यांच्या तपासणीचे उद्दिष्ट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : फळा स्पष्ट दिसत नसतानाही दृष्टिदोषाचे निदान न झाल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ शकतो. ही अडचण वेळीच ओळखून उपचार उपलब्ध करून देण्यासाठी बृहन्मुंबई महापालिका आणि व्हिजन फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बाल दृष्टी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत तीन वर्षांत महापालिकेच्या १,२०० शाळांमधील तीन लाख विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी करण्याचे उद्दिष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
फेब्रुवारी ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत २२७ महापालिका शाळांमधील ४० हजार २७० विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी करण्यात आली. या शाळांतील एकूण ५९ हजार १५० विद्यार्थ्यांपैकी सुमारे ६८ टक्के विद्यार्थ्यांपर्यंत तपासणी पोहोचली. तपासणी झालेल्यांमध्ये २० हजार ३९० मुले आणि १९ हजार ८८० मुलींचा समावेश आहे.
‘बाल दृष्टी’ उपक्रमात प्रामुख्याने अपवर्तन दोषाचे निदान आणि उपचारांवर भर दिला जात आहे. मुलांना स्वतःला स्पष्ट दिसत नसल्याचे अनेकदा लक्षात येत नाही किंवा ते ही अडचण सांगू शकत नाहीत. फळ्यावरील मजकूर उतरविण्यास जास्त वेळ लागणे, पुढच्या बाकावर बसण्याचा प्रयत्न करणे किंवा वाचन टाळणे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष झाल्यास दृष्टिदोषाचे निदान उशिरा होऊ शकते. तपासणीदरम्यान एका विद्यार्थ्याच्या एका डोळ्यात उणे ११.५० एसपीएच इतका निकट दृष्टिदोष आढळला, तर काही विद्यार्थ्यांच्या नोंदी उणे १६ एसपीएचपर्यंत होत्या. एका विद्यार्थ्याला मोतीबिंदू असल्याचेही निदान झाले. याशिवाय ३१ विद्यार्थ्यांमध्ये रंगदृष्टिदोष आढळला. उपक्रमांतर्गत आतापर्यंत ३६१ विद्यार्थ्यांना चष्मे देण्यात आले आहेत. संशयित नेत्रविकार असलेल्या विद्यार्थ्यांना ताडदेव रोड येथील व्हिजन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या कम्युनिटी आय क्लिनिकमध्ये पुढील तपासणीसाठी पाठविण्यात येते. तपासणीनंतर चष्मा, तज्ज्ञ उपचार किंवा शस्त्रक्रियेची गरज निश्चित केली जाते.
२८ टक्केच पोहोचले
नेत्रतपासणीनंतर पुढील उपचारांसाठी एक हजार ९५० विद्यार्थ्यांना संदर्भित करण्यात आले. त्यापैकी आतापर्यंत ५४९ विद्यार्थी संबंधित दवाखान्यात पोहोचले आहेत. म्हणजेच पुढील तपासणीसाठी पाठविलेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे २८ टक्के विद्यार्थ्यांनीच दवाखान्यात जाऊन तपासणी करून घेतली.