कोस्टल रोडवर बेकायदा मातीची भरणी
कंत्राटदराला पालिकेची कारणे दाखवा नोटीस
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : महापालिकेच्या अतिमहत्त्वाकांक्षी ‘कोस्टल रोड’ (दक्षिण) प्रकल्पात अनधिकृत माती वापरल्याचे उघडकीस आले आहे. भरणीसाठी अधिकृत खाणींऐवजी खासगी बांधकाम प्रकल्पांमधील खोदकामाची माती बेकायदा वापरल्याप्रकरणी पालिकेने कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली असून, ७२ तासांत खुलासा मागवला आहे.
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन पथकाने १ ऑक्टोबरला हाजी अली ते प्रियदर्शनी पार्कदरम्यान पाहणी केली असता, खासगी इमारतींच्या खोदकामातील माती थेट येथे आणली जात असल्याचे आढळले. यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आली नव्हती. प्रकल्पाच्या निविदेनुसार भरणीसाठी केवळ शासनमान्य स्रोतांतूनच माती आणणे बंधनकारक आहे.
कंत्राटदाराच्या या कृतीमुळे बांधकाम कचरा व्यवस्थापन नियम आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांचे थेट उल्लंघन झाले आहे. त्यामुळे हा अनधिकृत भराव कंत्राटदाराच्या खर्चाने का हटवला जाऊ नये आणि कंपनीवर दंडात्मक कारवाई का करू नये, असा जाब महापालिकेने विचारला आहे. योग्य उत्तर न मिळाल्यास कायदेशीर कारवाईसह संबंधित खासगी विकसकांवरही कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
प्रकल्पात नियमभंग
राडारोड्याची विल्हेवाट लावण्यावर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेने नुकतेच ‘मुंबई डेब्रिज कंट्रोल अँड ट्रॅकिंग सिस्टम’ हे पोर्टल सुरू केले आहे. तसेच, अधिकृत ट्रॅकिंग यंत्रणा नसलेल्या वाहनांवर १२ ऑक्टोबरपासून प्रतिफेरा २५,००० रुपयांचा दंड लागू केला आहे. ही धडक मोहीम सुरू असतानाच थेट पालिकेच्याच महत्त्वाकांक्षी प्रकल्पात नियमभंग आढळल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
..........