जितेंद्र परदेशी यांचे राजीनामा नाट्य अखेर संपले
चौकशीचा ससेमिरा संपताच अर्ध्या महिन्यात अर्ज मागे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : महापालिकेच्या उद्यान विभागातील विविध कंत्राट प्रकरणांमधील चौकशीचा ससेमिरा मागे लागल्याने राजीनामा देणारे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी अखेर आपला स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज मागे घेतला आहे. अवघ्या १४ दिवसांत त्यांनी आपला निर्णय बदलल्यामुळे पालिकेच्या वर्तुळात या ‘राजीनामा नाट्याची’ जोरदार चर्चा रंगली आहे. चौकशीच्या फेऱ्यामुळे त्यांनी दिलेला राजीनामा अखेर चौकशीचा फेरा थांबल्यानंतर मागे घेतला आहे.
उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या कार्यपद्धतीवर आणि विविध कंत्राट वाटपांवर पालिकेत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. आरटीआय कार्यकर्ते तक्रारदार संतोष दौंडकर यांनी १४ जुलैला दाखल केलेल्या तक्रार अर्जाच्या आधारे पालिकेच्या मुख्य तपासणी अधिकारी (दक्षता) विभागाने १० ऑगस्टला उद्यान विभागाला कारणे दाखवा पत्र पाठवले होते. त्यानंतर १ सप्टेंबरला दक्षता विभागाने पुन्हा स्मरणपत्र (रिमाइंडर) पाठवून विविध कामांचा तातडीने हिशेब मागवला होता.
यामध्ये वृक्षगणनेचा प्रत्यक्ष डेटा, ‘सार आयटी रिसोर्सेस’ कंपनीला दिलेली ग्रीन कव्हर मॅपिंग, हेरिटेज ट्री क्यूआर कोडिंग आणि मियावाकी मॅपिंग यांसारख्या कामांची निविदा प्रक्रिया, प्रशासकीय मंजुरी तसेच कंत्राटदाराला वितरित केलेल्या निधीचा सविस्तर तपशील सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. यासोबतच धोकादायक वृक्ष धोरणातील त्रुटी, मर्जीतील अधिकाऱ्यांना झुकते माप देणे याप्रकरणी प्रशासकीय चौकशीचा रोख वाढल्याने अडचणीत आलेल्या परदेशी यांनी गणेशोत्सवादरम्यान, म्हणजेच १६ सप्टेंबरला वैयक्तिक व प्रकृतीच्या कारणास्तव ३१ डिसेंबर २०२६ पासून स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा अर्ज सादर केला होता, मात्र राजीनामा देऊन दबाव टाकल्यानंतर परदेशी यांच्या विरोधात मवाळ झालेली चौकशी आणि प्रशासकीय पेच मावळल्याचे लक्षात येताच परदेशी यांनी राजीनामा नाट्य गुंडाळले. त्यांनी २९ सप्टेंबरला महापालिका प्रशासनाला पत्र लिहून, ‘‘वैयक्तिक कारणास्तव स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज मागे घेत आहे,’’ असे स्पष्ट केले.
प्रशासन पाठीशी घालत आहे?
चौकशीची चक्रे गतिमान झाल्यानंतर घाईघाईत दिलेला राजीनामा आणि अवघ्या दोन आठवड्यांत तो परत घेण्याची झालेली धावपळ, यामुळे पालिका मुख्यालयात उद्यान विभागातील आर्थिक गैरव्यवहार व वादग्रस्त कंत्राटांची चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. याबाबत तक्रारदार संतोष दौंडकर यांनी सांगितले की ‘‘लेखी तक्रार देऊन मी स्वतः उद्यान विभागातील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर आणली होती. दक्षता विभागाकडून ही कठोर कारवाई सुरू होती, मात्र परदेशी यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांना महापालिका प्रशासन पाठीशी घालत असल्याचे दिसते.’’
........