त्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क
आकारल्यास कारवाई
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा इशारा
मुंबई, ता. १३ : राज्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर केलेल्या तालुक्यांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. पात्र विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारल्यास संबंधित महाविद्यालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
दुष्काळामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होऊ नयेत आणि आर्थिक अडचणींमुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. महाविद्यालयांनी शुल्कमाफीची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसेच विद्यार्थ्यांच्या अडचणी संवेदनशीलतेने सोडवाव्यात, असे आवाहनही पाटील यांनी केले.
तक्रारींसाठी मध्यवर्ती कक्ष
दुष्काळग्रस्त भागांतील विद्यार्थ्यांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी उच्च शिक्षण संचालनालयाच्या स्तरावर मध्यवर्ती कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच, राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांमध्ये स्वतंत्र कृती समित्या (टास्क फोर्स) गठित करण्यात आल्या आहेत. या समित्यांमार्फत परीक्षा शुल्कमाफीसह अन्य शैक्षणिक अडचणी सोडविण्यात येणार आहेत. शासन निर्णयाच्या अंमलबजावणीचा आढावा उच्च शिक्षण संचालनालयाकडून दर महिन्याच्या १ आणि १६ तारखेला घेतला जाणार आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांना वेळेत लाभ मिळण्यास मदत होणार आहे.
कुलगुरूंची ऑनलाइन बैठक
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक, विद्यार्थी कल्याण संचालक आणि महाविद्यालयांच्या प्राचार्यांची ऑनलाइन आढावा बैठक होणार आहे. यात शुल्कमाफीची अंमलबजावणी आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांवरील उपाययोजनांचा आढावा घेतला जाईल. बैठकीस विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी आणि उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर उपस्थित राहणार आहेत.
विद्यापीठनिहाय संपर्क व्यवस्था
शुल्कमाफी किंवा अन्य शैक्षणिक अडचणींबाबत विद्यार्थ्यांनी संबंधित विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाशी किंवा विद्यार्थी विकास विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाने केले आहे. यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अमरावती, नागपूर, गडचिरोली आणि नाशिक येथील विद्यापीठांसह एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठात संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.