सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : मध्य रेल्वेने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत मालवाहतुकीतून चार हजार ११७.०७ कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत ४१.१० दशलक्ष टन मालाची वाहतूक करण्यात आली. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत मालवाहतुकीत सुमारे १० टक्के, तर महसुलात सहा टक्क्यांनी वाढ झाली. विशेष म्हणजे, सप्टेंबरमध्ये गेल्या १० वर्षांतील सर्वाधिक मासिक मालवाहतूक नोंदवण्यात आली. तसेच नव्या सेवांमुळेच मालवाहतुकीला गती येत असल्याचे आकडेवारीतून समाेर येते.
नागपूर विभागाचा सर्वाधिक वाटा
मध्य रेल्वेने एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान १५ हजार ६५२ मालगाड्यांमधून मालाची वाहतूक केली. गेल्या वर्षी याच कालावधीत १४ हजार ६२५ मालगाड्यांमधून ३७.३७ दशलक्ष टन मालाची वाहतूक झाली होती. त्यातून तीन हजार ८७४.३५ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. विभागनिहाय आकडेवारीत नागपूर विभाग आघाडीवर आहे. या विभागाने २४.२६ दशलक्ष टन मालाची वाहतूक करून दोन हजार ४६२.२७ कोटी रुपयांचा महसूल मिळवला. मध्य रेल्वेच्या एकूण मालवाहतुकीत नागपूर विभागाचा वाटा ५९ टक्के आहे. मुंबई विभागाने १०.१४ दशलक्ष टन मालाची वाहतूक करत ९६३.३४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले. एकूण वाहतुकीत मुंबई विभागाचा वाटा २४.६७ टक्के आहे.
कोळसा वाहतुकीत आघाडी
मालाच्या प्रकारानुसार कोळशाची वाहतूक सर्वाधिक झाली. सहा महिन्यांत पाच हजार १२७ मालगाड्यांमधून २०.९९ दशलक्ष टन कोळशाची वाहतूक करण्यात आली. त्यानंतर कंटेनर, पेट्रोलियम पदार्थ, सिमेंट आणि खतांचा क्रमांक लागतो.
नव्या सेवांमुळे मालवाहतुकीला चालना
मध्य रेल्वेने लोणी ते फारुखनगर (हरियाणा) दरम्यान पहिली ऑटोमोबाईल मालवाहतूक सेवा सुरू केली. या सेवेतून ७३ लाखांचे उत्पन्न मिळाले. याशिवाय, कळंबोली येथे उत्खनन यंत्रांच्या वाहतुकीसाठी, तर मिर्झा गुड्स शेडमध्ये कंटेनर वाहतुकीसाठी सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमांमुळे मालवाहतुकीच्या क्षेत्रात नव्या संधी निर्माण होत आहेत.
ग्राफिक्स : मध्य रेल्वेची मालवाहतूक एका दृष्टिक्षेपात
एप्रिल ते सप्टेंबर २०२६
- एकूण मालवाहतूक : ४१.१० दशलक्ष टन
- मालगाड्यांची संख्या : १५,६५२
- एकूण महसूल : ४,११७.०७ कोटी रुपये
- कोळसा वाहतूक : २०.९९ दशलक्ष टन
- महसुलातील वाढ : ६ टक्के
सप्टेंबर २०२६
- एकूण मालवाहतूक : ६.५९ दशलक्ष टन
- मालगाड्यांची संख्या : २,६०९
- महसूल : ६५५.१५ कोटी रुपये
- महसुलातील वाढ : २४ टक्के
सप्टेंबरमधील मालगाड्या
- कोळसा : ८१६
- ऑटोमोबाईल : १०४
- लोहखनिज : ८९
- क्लिंकर : ५९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.