जेव्हीपीडी उड्डाणपुलाचे काम
२०२७ अखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
पश्चिम उपनगरातील प्रवाशांच्या वेळेची बचत होणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. अंधेरी पश्चिम येथील सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाच्या टोकापासून जुहू-वेसावे जोड रस्त्यापर्यंत उभारल्या जाणाऱ्या ‘जेव्हीपीडी’ उड्डाणपुलाचे काम निर्धारित वेळेआधीच, म्हणजेच ३१ डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे गर्दीच्या वेळेत होणारा ४५ मिनिटांचा प्रवास अवघ्या २० मिनिटांवर येणार आहे.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी नुकतीच या उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी करून आढावा घेतला. या प्रकल्पाची अधिकृत मुदत ३१ मार्च २०२८ असली, तरी नागरिकांची वाहतूक कोंडीतून लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी काम ३१ डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
प्रकल्पाची जितकी वैशिष्ट्ये आहेत, तितकी अभियांत्रिकी आव्हानेदेखील आहेत. एकूण लांबी व रुंदी १,७५० मीटर (१.७५ किमी) लांब आणि १५.१० मीटर रुंद आहे. प्रकल्पाच्या मार्गातील ६०० मीमी व ९०० मीमीच्या जलवाहिन्या, तसेच १,२०० मीमी आणि ३०० मीमीच्या मलवाहिन्यांचे ‘मायक्रो टनेलिंग’ तंत्रज्ञानाद्वारे स्थलांतर केले जात आहे. मेट्रो मार्गिका २-बीच्या कामाशी मेळ घालत हे बांधकाम केले जाणार आहे. मेट्रो स्थानकाखाली गर्डर बसवण्यासाठी विशेष ‘स्लायडिंग’ तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. ९० फूट जंक्शन येथे ७२ मीटर लांबीचा आकर्षक कमानी पूल असेल. जुहू सर्कल परिसरात कमीत कमी खांब उभारून मोठ्या लांबीचे स्पॅन टाकण्याचे काम केले जाणार आहे. ‘‘प्रकल्पाचे नियोजन प्रभावीपणे व्हावे यासाठी संपूर्ण कामाची तीन टप्प्यांत विभागणी करावी. प्रत्येक टप्प्यासाठी स्वतंत्र पथक नेमून सर्व कामे समांतर पद्धतीने पूर्ण करावीत,’’ असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत.
वाहतुकीला मोठा दिलासा
हा उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर परिसरातील पाच प्रमुख वाहतूक जंक्शन टाळता येणार आहेत. त्यामुळे जुहू, विलेपार्ले पश्चिम, अंधेरी पश्चिम आणि वर्सोवा परिसरातील वाहतुकीला मोठा दिलासा मिळेल. याशिवाय, प्रस्तावित वेसावे-वांद्रे सागरी सेतू आणि मुंबई किनारा रस्ता (उत्तर) कडे जाणाऱ्या वाहनांसाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. पाहणीदरम्यान प्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी व सल्लागार उपस्थित होते.
..........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.