अभिनेता इम्रान खानला देश सोडण्यासाठी नोटीस
मुंबईतील सीजेपीच्या आंदोलनात सहभागाबद्दल आक्षेप
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात कॉक्रोच जनता पक्षाने (सीजेपी) केलेल्या आंदोलनात अभिनेता इम्रान खान सहभागी झाला होता. याप्रकरणी मुंबईतील परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाने (एफआरआरओ) अमेरिकन नागरिक असल्याने त्याला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्यास सांगितले आहे.
अभिनेता इम्रानला फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिसने (एफआरआरओ) नोटीस बजावली आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे मुंबईतील पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. इम्रान हा ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया (ओसीआय) कार्डधारक आहे. १० ऑक्टोबरला मुंबई सेंट्रल येथील ऑगस्ट क्रांती मैदानावर सीजेपीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात आंदोलन केले होते. यात इम्रानच्या सहभागाबद्दल सोमय्या यांनी आक्षेप घेतला होता. सोमय्या यांनी मुंबई पोलिसांकडे इम्रानच्या नागरिकत्वाची पडताळणी करण्याची मागणी केली होती. परदेशी नागरिकाने राजकीय आंदोलनात सहभागी होणे योग्य आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.
‘‘ओसीआय कार्डवर भारतात वास्तव्यास असलेल्या अभिनेता इम्रान खानला एफआरआरओने नोटीस बजावली आहे. अभिनेता आमिर खानचा भाचा असलेला इम्रान खार येथे राहतो. त्याला तेथे नोटीस देण्यात आल्याचे मुंबईतील पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
==
आमचे अनेक मित्र परदेशात राहतात, तिकडे आंदोलन करतात, मात्र त्यासाठी त्यांना हद्दपार केले जात नाही. केवळ आंदोलन केले म्हणून एखाद्याला हद्दपार करणे हे लोकशाही धरून नाही. हत्या आणि बलात्काराचे आरोपी काही राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्याचे काय?
- सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस (शप)
===
==
इम्रान खानवर कारवाई केली. मग कॅनडाचा नागरिक असलेल्या अक्षय कुमारवर कारवाई केव्हा करणार, समाजमाध्यमांवर मोदींचा जयजकार करतो, ते राजकीय कृतीच्या व्याख्येत बसत नाही का?
- प्रशांत भूषण, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ
़़़़़
अमेरिकेचे नागरिकत्व असल्याचा दावा करण्यात आलेल्या इम्रान खानला भारतातील एनडीए सरकारविरोधात आंदोलन करण्याऐवजी अमेरिकेत जाऊन आंदोलन करावे.
- प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
़़़़़़़़़़़़
नोटिशीला आव्हान देणार
मुंबई : परदेशी नागरिक कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून परदेशी क्षेत्रीय नोंदणी कार्यालयाने (फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिस) बजावलेल्या नोटिशीला अभिनेता इम्रान खान उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. वकील झुल्फिकार मेमन यांच्यामार्फत इम्रान याचिका करणार आहे आणि मुख्य न्या. महेश चंद्र त्रिपाठी आणि न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर येण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्यावर तातडीची सुनावणी होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.