मुंबईची दीर्घकालीन जलसुरक्षा सुदृढ करणार!
मनोरी येथे ४,०७७ कोटींच्या निःक्षारीकरण प्रकल्पाचा मार्ग मोकळा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : वाढती लोकसंख्या, जलद शहरीकरण आणि हवामानातील बदलांमुळे भविष्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुंबईच्या किनारी भागात असलेल्या मनोरी येथे २०० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या अत्याधुनिक समुद्रजल निःक्षारीकरण प्रकल्पाच्या उभारणीचे काम प्रत्यक्षात सुरू केले आहे. भविष्यात हा प्रकल्प ४०० दशलक्ष लिटर प्रतिदिनपर्यंत विस्तारित करण्याची तरतूद करण्यात आली असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा प्रत्यक्ष शुभारंभ १५ डिसेंबर २०२५ मध्ये झाला आहे. अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी या प्रकल्पाचे पत्रकारांसमोर सादरीकरण केले.
सध्या मुंबईची पाण्याची दैनिक मागणी सुमारे ४,६०० दशलक्ष लिटर असून, २०४१ पर्यंत ती ६,४२४ दशलक्ष लिटर प्रतिदिनपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. मुंबईचे विद्यमान जलस्रोत प्रामुख्याने मॉन्सूनच्या पावसावर अवलंबून आहेत, मात्र हवामानातील बदलांमुळे अनिश्चित पाऊस किंवा पर्जन्यमानातील विलंब यामुळे उपलब्ध जलस्रोतांवर प्रचंड ताण येतो. यावर शाश्वत उपाय म्हणून समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी तयार करणारा हा प्रकल्प मुंबईच्या दीर्घकालीन जलसुरक्षेचा भक्कम आधार ठरणार आहे.
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेने ‘टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स लिमिटेड’ यांना सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे, तर कंत्राटाची जबाबदारी ‘जीव्हीपीआर-आयडीई संयुक्त उपक्रम’ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मनोरी येथील २०० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या (४०० दशलक्ष लिटर प्रतिदिनपर्यंत विस्तारित क्षमतेसह) निःक्षारीकरण प्रकल्पाच्या कंत्राटाचे मूल्य रचना व बांधकामासाठी ४,०७७ कोटी रुपये आणि २० वर्षांच्या परिचालन व देखभालीसाठी २,०१४ कोटी रुपये असून, या प्रकल्पाची संकल्पचित्रे व बांधकामाचे काम १५ डिसेंबर २०२५ रोजी सुरू होऊन १४ डिसेंबर २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे ठरवण्यात आले आहे.
मनोरी येथील हा प्रकल्प अत्याधुनिक ‘सी वॉटर रिवर अस्मोयसिस’ तंत्रज्ञानावर आधारित आहे. समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या या प्रक्रियेमध्ये पूर्व-प्रक्रिया, दुहेरी-टप्पा आरओ आणि पुनर्खनिजीकरण यांचा समावेश आहे. या संपूर्ण प्रक्रियेद्वारे मिळणाऱ्या उत्पादित पाण्याची गुणवत्ता ही अत्यंत उच्च दर्जाची असणार असून, शुद्ध पाण्याचे प्रमाण भांडुप जलशुद्धीकरण केंद्राच्या निकषांशी पूर्णपणे सुसंगत आहे. तसेच, प्रकल्पाच्या परिचालनासाठी १०० टक्के हरित ऊर्जेचा वापर केला जाणार आहे.
समुद्रकिनाऱ्यालगत व समुद्रात चालणाऱ्या या प्रकल्पामुळे सागरी परिसंस्थेला किंवा जलचरांना कोणतीही बाधा पोहोचू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. डिझायनिंग व खोदाईसाठी थेट खोदकामाऐवजी टीबीएम यंत्राच्या सहाय्याने समुद्रतळाखाली बोगदे तयार केले जात आहेत, ज्यामुळे तळाशी असणाऱ्या सजीवांच्या अधिवासाला धक्का लागत नाही. खडकाळ भागात स्फोटांचा वापर पूर्णपणे टाळून यांत्रिक खडक कर्तन पद्धतीचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.
जनजागृती करण्यावर भर
जल आदानाजवळ पाण्याचा वेग सेकंदाला ०.१५ मीटर इतका अतिशय मर्यादित ठेवण्यात आला आहे. ज्यामुळे मासे किंवा जलचर जाळ्यांवर अडकणे टाळता येते. तसेच, प्रक्रियेनंतरचे क्षारयुक्त पाणी समुद्रात सुरक्षितपणे सोडण्यासाठी १५ विसारकांद्वारे जलद विसरण केले जाते. मनोरी ग्रामस्थ आणि लोकांमध्ये या प्रकल्पाविषयी काही गैरसमज असून, ते गैरसमज दूर करण्यासाठी या प्रकल्पाचे सादरीकरण आणि जनजागृती करण्यावर भर दिला जात असल्याची माहितीदेखील अभिजित बांगर यांनी दिली.
............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.