सावंतवाडी स्थानकाच्या पूर्वेला नवी इमारत!
३.२८ कोटींचा खर्च; तिकिटासाठी पश्चिमेला जाण्याची कसरत थांबणार
नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी सुमारे तीन कोटी २८ लाख रुपये खर्चून नवीन स्थानक इमारत उभारण्यात येणार आहे. सध्या तिकीट आणि आरक्षणाच्या सुविधा पश्चिमेकडील बाजूला असल्याने पूर्वेकडून येणाऱ्या प्रवाशांना यासाठी पश्चिमेकडे जावे लागते. ही गैरसोय दूर करण्यासाठी पूर्वेकडील बाजूला बुकिंग कार्यालय, प्रवासी लाऊंज, प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) केंद्र आणि तिकीट काउंटर उभारण्यात येणार आहेत. पावसाळ्यातील अडथळे आणि तांत्रिक बाबी लक्षात घेऊन हे काम दीड वर्षात, जास्तीत जास्त दोन कामाच्या हंगामांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
पूर्वेकडून स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी पश्चिमेला जावे लागत असल्याने त्यांचा वेळ आणि श्रम खर्च होतात. ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलांसह प्रवास करणारे कुटुंबीय आणि सामान घेऊन येणाऱ्या प्रवाशांना या गैरसोयीचा अधिक त्रास होऊ शकतो. पूर्वेकडे स्वतंत्र तिकीट काउंटर आणि बुकिंग कार्यालय सुरू झाल्यानंतर प्रवाशांना स्थानक परिसरातच तिकीटविषयक कामे करता येतील. प्रवासी लाउंजमुळे गाडीची वाट पाहण्यासाठीही स्वतंत्र जागा उपलब्ध होईल.
आरक्षणाची सुविधाही मिळणार
नवीन इमारतीत प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) केंद्राची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे आरक्षणाशी संबंधित कामांसाठी पश्चिमेकडील बाजूला जाण्याची गरज कमी होऊ शकते. पूर्वेकडील परिसरातील प्रवाशांना रेल्वेच्या विविध सुविधांचा लाभ घेणे अधिक सोयीचे होईल, मात्र पूर्वेकडील इमारतीला स्वतंत्र प्रवेशमार्ग उपलब्ध होणार का, याबाबत अधिकृत माहिती स्पष्ट झाल्यानंतरच प्रवाशांच्या सोयीचे नेमके स्वरूप समोर येईल.
टर्मिनसच्या विस्ताराचाही प्रश्न
सावंतवाडी रोड स्थानकाचा टर्मिनस म्हणून विकास व्हावा, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून केली जात आहे. अतिरिक्त फलाट, लूप लाइन आणि गाड्या उभ्या करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त होत आहे. भविष्यात रेल्वेगाड्यांची संख्या वाढविण्यासाठी या पायाभूत सुविधांना महत्त्व आहे.
सप्टेंबरमध्ये प्रस्तावित बांधकामावरून प्रवासी संघटनेने आक्षेप घेतला होता. नवीन इमारतीच्या उभारणीमुळे भविष्यातील फलाट विस्तार आणि लूप लाइनसाठी उपलब्ध जागेवर परिणाम होण्याची भीती संघटनेने व्यक्त केली होती. त्यामुळे पूर्वेकडील प्रवाशांची सध्याची गैरसोय दूर करतानाच स्थानकाच्या भविष्यातील विस्ताराचे नियोजनही महत्त्वाचे ठरणार आहे.
दीड वर्षात काम पूर्ण करण्याचे लक्ष्य
पावसाळ्यातील अडथळे आणि अन्य तांत्रिक बाबी विचारात घेऊन नवीन स्थानक इमारतीचे काम दीड वर्षात, जास्तीत जास्त दोन कामाच्या हंगामांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. नव्या इमारतीमुळे पूर्वेकडील प्रवाशांना तिकीट, आरक्षण आणि प्रतीक्षेसाठी स्वतंत्र सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे या कामाच्या पूर्ततेकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.