दसरा मेळाव्यासाठी
दादर परिसरात वाहतूक बदल
उपनगरांतून येणाऱ्या बस, कारसाठी स्वतंत्र पार्किंग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : शिवसेनेचा (ठाकरे गट) शिवाजी पार्क येथे २० ऑक्टोबरला दसरा मेळावा होणार आहे. मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक येण्याची शक्यता असल्याने दादर आणि परिसरातील वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. पश्चिम व पूर्व उपनगरे, ठाणे, नवी मुंबई तसेच दक्षिण मुंबईतून मेळाव्यासाठी नागरिकांना घेऊन येणाऱ्या बस आणि कारसाठी स्वतंत्र पार्किंगची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.
पश्चिम उपनगरांतून पश्चिम द्रुतगती मार्गाने येणाऱ्या बससाठी सेनापती बापट मार्ग आणि एलफिन्स्टन रोड येथील कामगार मैदान परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. कारसाठी सेनापती बापट मार्गावरील इंडिया बुल फायनान्स सेंटर आणि दादर पश्चिम येथील कोहिनूर मिल कम्पाउंडमधील कोहिनूर स्क्वेअर येथे पार्किंगची सुविधा असेल.
ठाणे आणि नवी मुंबईकडून पूर्व द्रुतगती मार्गाने येणाऱ्या बससाठी माटुंगा आणि वडाळा परिसरात पार्किंगची व्यवस्था केली आहे. यामध्ये माटुंगा पूर्व येथील पाच गार्डन परिसरातील लेडी जहांगीर रोड, नाथालाल पारेख मार्ग, एडनवाला रोड तसेच वडाळा पश्चिम येथील आर. ए. के. रोड परिसराचा समावेश आहे. दक्षिण मुंबईकडून वीर सावरकर मार्गाने येणाऱ्या वाहनांमधील प्रवाशांना प्रथम प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर परिसरात उतरविण्यात येणार आहे. त्यानंतर बस आप्पासाहेब मराठे मार्गावर पार्क कराव्या लागतील. कारसाठी सेनापती बापट मार्गावरील ज्युपिटर मिल कम्पाउंडमधील इंडिया बुल १ सेंटर येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. दसरा मेळाव्यामुळे दादर, शिवाजी पार्क, प्रभादेवी, माटुंगा आणि लगतच्या परिसरात वाहनांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेळाव्यासाठी येणाऱ्या वाहनचालकांनी निश्चित केलेल्या पार्किंग व्यवस्थेचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.