‘सीएसएमटी’तून चिमुरडीचे अपहरण
१४ तासांत शोध; आरोपी महिलेला अटक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकातून एक वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास करताना अवघ्या १४ तासांत चिमुरडीचा शोध घेण्यात सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांना यश आले. याप्रकरणी पूजा शिंदे (वय २३, रा. सायन कोळीवाडा) या महिलेला अटक करण्यात आली आहे. चिमुरडीला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले असून, आरोपी महिला सध्या पोलिस कोठडीत आहे.
गौरी पवार (वय २०) या घाटकोपर पश्चिम येथे राहतात. त्या गुरुवारी (ता. १५) पती आणि एक वर्षाच्या मुलीसह लातूर एक्स्प्रेसने मूळ गावी उस्मानाबादला जाण्यासाठी सीएसएमटी स्थानकात आल्या होत्या. रात्री गाडी सुटून गेल्याने कुटुंबाने फलाट क्रमांक १२ आणि १३ जवळील लोखंडी बाकाजवळ झोपण्याचा निर्णय घेतला. पहाटे ५.२५च्या सुमारास गौरी यांना जाग आली, तेव्हा मुलगी जवळ नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. परिसरात शोध घेऊनही मुलगी न सापडल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांनी स्थानकातील सीसीटीव्ही चित्रण तपासले. त्यामध्ये लाल रंगाचा कुर्ता घातलेली एक महिला चिमुरडीला घेऊन जाताना दिसली. या चित्रणाच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अवघ्या १४ तासांत चिमुरडीचा शोध घेऊन संशयित महिलेला अटक करण्यात आली. सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पूजा शिंदे हिला अटक केली. तिला न्यायालयात हजर करण्यात आले असून, ती सध्या पोलिस कोठडीत असल्याची माहिती सीएसएमटी लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी कटारे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.