पाणीगळतीचे संकट कायम
जलवाहिन्यांची दुरुस्ती, आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल नोंदींच्या वापराची गरज
मुंबई, ता. १९ ः मुंबईत पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता असल्याने उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यावर पालिकेने भर दिला आहे. मुंबईच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतून सुमारे २५ ते ३० टक्के पाणीगळती होत आहे. गळतीमुळे सुमारे ७०० दशलक्ष लिटर पाणीगळती रोखण्याचे मोठे आव्हान मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागापुढे आहे. गळतीद्वारे वाया जाणारे आणि वाचवल्यास संकटकाळात मुंबईकरांना मोठा दिलासा मिळू शकतो
‘एल निनो’मुळे यंदा राज्यासह मुंबईत पाण्याच्या संकटाची भीती व्यक्त होत आहे. त्यात वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन होत असून, धरणातील पाणीसाठ्यात घट होत आहे. त्यामुळे पुढील पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे. मुंबईला मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, तानसा, भातसा, तुळशी व विहार या सात धरणांतून पाणीपुरवठा होतो. मुंबईला दररोज ४,१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागविण्यासाठी वर्षाला १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. सध्या पुरेसा जलसाठा असला तरी त्यात घट होत आहे.
गळती रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा
पाणीगळती नेमकी कुठे आणि किती प्रमाणात होते, याचा शोध घेण्यासाठी जलवाहिन्यांचे नियमित सर्वेक्षण, दाबाचे निरीक्षण, गळती शोधणारी आधुनिक उपकरणे आणि डिजिटल जललेखा प्रणालीचा वापर आवश्यक आहे. जुन्या व जीर्ण जलवाहिन्यांची टप्प्याटप्प्याने दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी केल्यास पाण्याचे नुकसान कमी करता येऊ शकते. तसेच पाणीपुरवठा होणाऱ्या प्रत्येक विभागात किती पाणी पाठविले आणि प्रत्यक्षात किती पाणी ग्राहकांपर्यंत पोहोचले, याची अचूक नोंद ठेवणे गरजेचे असल्याचे मत माजी जल अभियंत्यांनी व्यक्त केले आहे.
पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा
सुमारे ७०० दशलक्ष लिटर पाणी वाचविण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी किती कालावधी निश्चित केला आहे, त्यासाठी किती निधी उपलब्ध आहे आणि आतापर्यंत किती पाणी वाचविण्यात आले आहे, याची अधिकृत आकडेवारी महत्त्वाची ठरणार आहे. पाणीटंचाईच्या संभाव्य परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविणे आवश्यक असताना, मुंबई महापालिकेची गळती रोखण्याची मोहीम कितपत प्रभावी ठरते, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी जलवाहिन्या नवीन टाकण्याचे काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे. लवकरच गळती कमी करण्यात यश येईल, असा विश्वास पालिकेच्या जल अभियंता विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
चौकशी, ऑडिट करा!
वर्षानुवर्षे होणारी २५ ते ३० टक्के पाणीगळती मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागाला रोखता आलेली नाही, हे मोठे कोडेच आहे. इतके पाणी दररोज जाते कुठे, ते कोणाला पुरविले जाते, याची चौकशी आणि ऑडिट होणे गरजेचे आहे, अशी मागणी पाणी हक्क समितीचे समन्वयक सीताराम शेलार यांनी केली आहे.
जलसाठ्याची सध्याची स्थिती
एकूण जलसाठा ९१.४७ टक्के (१३ लाख २३ हजार ८६३ दशलक्ष लिटर)
भातसा - ६,७८,१७४ दशलक्ष लिटर
अप्पर वैतरणा - २,१९,६६८ दशलक्ष लिटर
मध्य वैतरणा १,९३,५३० दशलक्ष लिटर
मोडक सागर ६७,२२१ दशलक्ष लिटर
तानसा - १,२९,७७४ दशलक्ष लिटर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.