पोकळ घोषणा नको,
बिश्नोईच्या मुसक्या आवळा!
काॅँग्रेसचे मुख्यमंत्र्यांना आव्हान
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावरील गाेळीबारानंतर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेला आला आहे. लॉरेन्स बिश्नोई टाेळीने या हल्ल्याची कथितरीत्या जबाबदारी स्वीकारली आहे. गुंड लाॅरेन्स हा गुजरातच्या जेलमध्ये बंद आहे. तेथूनच तो गुन्हेगारी कारवाया करत असेल, तर सरकारच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोकळ घोषणाबाजी करण्यापेक्षा बिश्नोईच्या मुसक्या आवळून त्याला मुंबईत आणावे आणि त्याची चौकशी करण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, ‘मुंबई पोलिसांचा दरारा व नावलौकिक आता इतिहासजमा झाला आहे. गुन्हेगारांवर त्यांचा वचक राहिलेला नाही. मुंबईच नाहीतर पुणे, ठाणे, नागपुरातही खुलेआम गुन्हेगारी होत आहे; पण मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे काहीही करू शकत नाहीत. महाराष्ट्राच्या इतिहासातील ते सर्वात निष्क्रिय गृहमंत्री आहेत.’
राष्ट्रवादी काॅँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या, अभिनेता सलमान खान आणि चित्रपटनिर्माता रोहित शेट्टी यांच्या घरांवरील हल्ले यात बिश्नोई टाेळीचा हात असल्याचे सांगितले गेले, मग आतापर्यंत या माफियाची चौकशी का केली नाही. महाराष्ट्र पोलिसांचे हात कोणी बांधले आहेत, असा सवालही सपकाळ यांनी केला.
केंद्रीय गृहविभागाने ऑगस्ट २०२३ मध्ये जारी केलेल्या एका आदेशानुसार फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २६८ चा वापर करून लॉरेन्स बिश्नोईला सुरक्षा कवच दिले आहे, असा आराेप सपकाळ यांनी केला आहे. या कलमानुसार लॉरेन्स बिश्नोईला चौकशीसाठी काेणत्याही राज्याचे पाेलिस गुजरातबाहेर घेऊन जाऊ शकत नाहीत. या आदेशाचे दरवर्षी एका वर्षाच्या कालावधीसाठी नूतनीकरण केले जाते. त्यामुळे तो जेलमध्ये बसून लोकांच्या हत्या, हल्ले घडवून आणत आहे. केंद्र सरकारने त्याला दिलेले हे कवच काढून घ्यावे, अशी मागणी महाराष्ट्र सरकारने करावी, अशी सूचनाही सपकाळ यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.