टायगर श्रॉफ गोळीबारात रॅपिडोचालकाचे नाव
कंपनीच्या कामकाजाची चौकशी करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : सिनेअभिनेता टायगर श्रॉफ यांच्याशी संबंधित हल्ल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयितांपैकी एक जण रॅपिडो बाइकचालक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, रॅपिडोच्या बाइक टॅक्सी सेवांवर तातडीने बंदी घालून कंपनीच्या संपूर्ण कामकाजाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र कामगार सभेने सोमवारी (ता. १९) केली.
महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर यांनी सांगितले की, ‘रॅपिडोकडून चालकांची ओळख, पार्श्वभूमी, आवश्यक कागदपत्रे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या नियमांचे पालन याबाबत गंभीर अनियमितता सुरू आहे. कंपनीकडून कोणतीही पुरेशी कागदपत्रे पडताळणी न करता रोजगार दिला जात असल्यास, देशविरोधी कारवायांसाठी आलेले दहशतवादी किंवा इतर गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक मुंबईसारख्या प्रमुख शहरांत वर्षानुवर्षे वावरू शकतात. हा केवळ कायदा व सुव्यवस्थेचा नव्हे, तर राष्ट्रीय सुरक्षेचा गंभीर प्रश्न आहे. या संपूर्ण यंत्रणेची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.’ पुढे ते म्हणाले, ‘सरकारी नियम धाब्यावर बसवून व्यवसाय सुरू ठेवण्याची मुभा कोणत्याही कंपनीला देता कामा नये, बेकायदा सेवा सुरू ठेवणाऱ्या कंपनीवर केवळ चालकांपुरती कारवाई करून चालणार नाही; त्यामागील व्यावसायिक यंत्रणा, व्यवस्थापन, आर्थिक व्यवहार आणि लाभ घेणाऱ्या जबाबदार व्यक्तींवरही कठोर कारवाई झाली पाहिजे. दोष सिद्ध झाल्यास कठोर शिक्षा आणि कंपनीविरोधात कायमस्वरूपी दंडात्मक कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.’
रॅपिडोचे स्पष्टीकरण
टायगर श्रॉफ गोळीबारातील आरोपी रॅपिडो चालक १४ ऑक्टोबरपासून सक्रिय नव्हता. भारतातील व्यापक गिग अर्थव्यवस्थेत एकाच व्यक्तीची एकाच वेळी अनेक प्लॅटफॉर्मवर नोंदणी असणे ही सामान्य बाब आहे. घटनेच्या दिवशी संबंधित व्यक्तीने रॅपिडोच्या सेवेचा ग्राहक म्हणून वापर केला होता. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या आम्ही सातत्याने संपर्कात असून, तपासासाठी त्यांना पूर्ण सहकार्य करत आहोत, असे रॅपिडोच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
==
१२ ऑक्टोबरच्या सूचनेकडे दुर्लक्ष
संबंधित रॅपिडोचालक १४ ऑक्टोबरपासून कार्यरत नव्हता, असे कंपनीचे म्हणणे आहे, मात्र १२ ऑक्टोबर रोजी एका प्रवाशाने ‘एक्स’ पोस्टद्वारे कोणत्याही कंपनीकडून रायडर्सची पोलिस पडताळणी केली जात नाही. कंपन्यांचे लक्ष केवळ महसूल वाढवण्यावर आहे. काही रायडर्सची गुन्हेगारी पार्श्वभूमीही असते, तसेच असे काही रायडर्स प्रवाशांना लगेच शिवीगाळ करतात आणि त्यांच्यावर हल्लाही करतात अशा शब्दांत लक्ष वेधले होते, मात्र त्याकडे कंपनीने दुर्लक्ष केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.