परदेशांत फराळ पाठवण्यासाठी पोस्टाची विशेष सुविधा
मोफत पिकअप सेवा; काही ठिकाणी पॅकिंगचीही सोय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : दिवाळीनिमित्त परदेशात राहणाऱ्या नातेवाईक आणि मित्रांना घरचा फराळ पाठवण्यासाठी महाराष्ट्र टपाल परिमंडळाने आंतरराष्ट्रीय पार्सल सेवा उपलब्ध करून दिली आहे. चकली, चिवडा, लाडू, करंजी, शंकरपाळे तसेच भेटवस्तू या सेवेद्वारे विविध देशांत पाठवता येणार आहेत. नागरिकांच्या सुविधेसाठी प्रमुख पोस्ट कार्यालयांत पॅकिंगसह मोफत घरपोच पार्सल पिकअपचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
टपाल विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १० किलोंच्या पार्सलसाठी जपानला ४,७९७ रुपये, जर्मनीला ५,८७६, ब्रिटनला ६,४६१, फ्रान्सला ६,६३८, रशियाला ६,७५०, अमेरिकेला ९,०५१, कॅनडाला ९,६७६; तर ऑस्ट्रेलियासाठी ११,९१२ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. राज्यातील सर्व जनरल पोस्ट ऑफिस (जीपीओ), मुख्य पोस्ट ऑफिस आणि निर्धारित पोस्ट कार्यालयांमध्ये पार्सलच्या सुरक्षित पॅकिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. प्रमुख पोस्ट कार्यालयांत जलद पॅकिंगसाठी आवश्यक उपकरणेही बसविण्यात आली आहेत. पोस्ट ऑफिसमध्ये जाणे शक्य नसलेल्या नागरिकांसाठी पोस्टमनमार्फत मोफत घरपोच पार्सल पिकअपची सोय आहे. त्यासाठी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येईल. परदेशातील आप्तेष्टांना फराळ आणि दिवाळीच्या भेटवस्तू पाठवण्यासाठी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र टपाल परिमंडळाचे मुख्य पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.