कल्याण-आसनगाव मार्गावर चौथी मार्गिका!
१,६२० कोटींचा प्रकल्प; वनजमिनीच्या मंजुरीची प्रतीक्षा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : मुंबई उपनगरी रेल्वेवरील वाढता प्रवासी भार कमी करून लोकलची वाहतूक अधिक सुरळीत करण्यासाठी कल्याण-आसनगावदरम्यान चौथी रेल्वे मार्गिका उभारण्यात येणार आहे. सुमारे १,६२० कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक क्षमता वाढण्यास मदत होणार आहे, मात्र प्रकल्पाला गती देण्यासाठी ठाणे आणि शहापूर वन विभागाच्या अखत्यारीतील सुमारे ६.५ हेक्टर वनजमिनीच्या वापरासाठी केंद्र सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.
कल्याण-आसनगाव रेल्वे मार्गावर सध्या दोन मार्गिका कार्यरत असून, तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू आहे. या मार्गावर लोकल, मेल-एक्स्प्रेस आणि मालगाड्या धावत असल्याने रेल्वे वाहतुकीवर मोठा ताण येतो. मर्यादित मार्गिकांमुळे गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यातही अडचणी येतात. त्यामुळे या मार्गावर ३२.२३ किलोमीटर लांबीची चौथी मार्गिका उभारण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च १,६१९.९६ कोटी रुपये असून, रेल्वे आणि महाराष्ट्र सरकार प्रत्येकी ५० टक्के खर्च उचलणार आहेत. चौथ्या मार्गिकेमुळे रेल्वे वाहतुकीचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येईल आणि गाड्यांची वर्दळ सुरळीत होण्यास मदत होईल. प्रस्तावित चौथी मार्गिका कल्याण, शहाड, आंबिवली, टिटवाळा, खडवली, वासिंद आणि आसनगाव या स्थानकांमधून जाणार आहे. तसेच कल्याण, टिटवाळा, खडवली, वासिंद आणि आसनगाव येथील रेल्वे यार्डही या प्रकल्पाशी जोडले जाणार आहेत. उपलब्ध रेल्वे जमिनीचा जास्तीत जास्त वापर करून अतिरिक्त जमीन संपादनाची गरज कमी ठेवण्याच्या दृष्टीने विद्यमान आणि प्रस्तावित मार्गिकांच्या समांतर या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे.
प्रस्ताव केंद्र सरकारकडे
प्रकल्पासाठी ठाणे आणि शहापूर वन विभागाच्या अखत्यारीतील सुमारे ६.५ हेक्टर वनजमिनीचा वापर करावा लागणार आहे. या जमिनीच्या वापरासाठी मध्य रेल्वेने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. या मंजुरीनंतर प्रकल्पाच्या कामाला गती मिळण्याची अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.