ई-ऑफिसमुळे पालिकेच्या कामकाजाला गती
प्रलंबित फाइल्सचा निपटारा होणार; प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता वाढणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणण्यासह प्रलंबित प्रकरणे आणि फाइल्सच्या निपटाऱ्याला वेग देण्यासाठी ई-ऑफिस प्रणालीचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे फाइल्सवरील अवलंबित्व कमी होऊन कार्यालयीन कामकाज अधिक गतिमान आणि पारदर्शक होणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.
ई-ऑफिस प्रणालीच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक फाइल्स तयार करणे, त्यांचे व्यवस्थापन करणे तसेच संबंधित अधिकारी आणि कार्यालयांकडे त्या पाठविण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे, आवक-जावक पत्रव्यवहाराची नोंद ठेवणे, प्राप्त पत्रे स्कॅन करून प्रणालीत समाविष्ट करणे आणि त्यावर झालेल्या कार्यवाहीचा मागोवा घेणे शक्य होणार आहे. तसेच टिप्पण्या, मसुदे आणि आदेशांना डिजिटल स्वाक्षरीच्या माध्यमातून मंजुरी देण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे. या प्रणालीमुळे कोणती फाइल कोणत्या अधिकाऱ्याकडे प्रलंबित आहे, त्यावर आतापर्यंत कोणती कार्यवाही झाली आहे आणि कोणते निर्णय घेण्यात आले आहेत, याची माहिती सहज उपलब्ध होणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. या फाईल्सच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आणि प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करणे सोपे होणार आहे.
निर्णय प्रक्रियाही गतिमान
इलेक्ट्रॉनिक अभिलेखांची नोंद, जतन आणि संग्रहण करण्याची सुविधा मिळणार असून, विविध दस्तऐवजांचा केंद्रीकृत संग्रह यामुळे उपलब्ध होईल, त्यामुळे जुन्या नोंदी आणि आवश्यक कागदपत्रे शोधण्यासाठी लागणारा वेळ कमी होण्यास मदत होणार आहे. ई-ऑफिस प्रणालीचा प्रभावी वापर केल्यास प्रशासकीय निर्णयप्रक्रियेला गती मिळण्याबरोबरच कामकाजातील उत्तरदायित्व वाढण्यासही हातभार लागणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.