खिशाला झळ, तरी मेळाव्याची ओढ कायम!
राज्यभरातून शिवाजी पार्कवर शिवसैनिकांची हजेरी
मुंबई, ता. २० : प्रवासाचा खर्च, लांबचे अंतर आणि येण्या-जाण्याची कसरत असली, तरी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याची ओढ शिवसैनिकांना मुंबईत घेऊन आली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवसैनिकांसाठी हा केवळ राजकीय कार्यक्रम नसून शिवसेनेशी असलेले भावनिक नाते जपण्याचा सोहळा असल्याचे शिवसैनिकांनी या वेळी सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी जोडलेली निष्ठा आणि नेत्यांना प्रत्यक्ष ऐकण्याची उत्सुकता यामुळे अनेकांनी खर्चाची पर्वा न करता मेळाव्याला हजेरी लावली.
कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातून शिवसैनिकांनी रेल्वे, एसटी आणि खासगी वाहनांनी मुंबई गाठली. काहींनी रात्रभर प्रवास करून शिवाजी पार्क परिसर गाठला. प्रवास आणि जेवणाचा खर्च, वेळेचे नियोजन अशा अडचणी असल्या, तरी मेळाव्याला उपस्थित राहण्याचा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. खेड येथील शिवसैनिक भगवान कोंडे यांनी सांगितले की, ‘गावातून मुंबईला येण्यासाठी प्रवासाचे नियोजन करावे लागते, येण्या-जाण्याचा खर्चही वाढला आहे. तरीही मेळाव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवर पोहोचल्यावर राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून आलेले शिवसैनिक भेटतात, जुन्या सहकाऱ्यांशी गप्पा होतात. हीदेखील मेळाव्याला येण्यामागची एक महत्त्वाची गोष्ट आहे.’ तर धाराशिव येथील शिवानंदन बिडवे म्हणाले, ‘पक्षात फूट पडल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाले. अशा वेळी दसरा मेळाव्यातून पक्षाची भूमिका आणि पुढील वाटचाल समजून घेता येते. त्यामुळे आम्ही मेळाव्याला येऊन नेत्यांचे विचार ऐकतो आणि गावात परतल्यावर कार्यकर्त्यांशी त्यावर चर्चा करतो.
दसरा मेळाव्याशी शिवसैनिकांचे भावनिक नाते आहे. दरवर्षी या मेळाव्यातून कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळते. महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती यांसारख्या प्रश्नांवर नेतृत्वाने आवाज उठवावा. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि सामान्य जनतेच्या अडचणी दूर करण्यासाठी ठोस भूमिका मांडली जावी, अशी अपेक्षा आहे.
- अजीज मोमीन, शिवसैनिक, संगमनेर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.