दसऱ्याचा मुहूर्त हुकला, आता दिवाळीपूर्वी घराची चावी द्या!
ना. म. जोशी मार्ग बीडीडीवासीयांची मागणी; मुख्यमंत्र्यांची वेळ न मिळाल्याने चावीवाटप लटकले; रहिवाशांमध्ये नाराजी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : ना. म. जोशी मार्ग बीडीडीवासीयांचा दसऱ्याच्या मुहूर्तावर नव्या घरात जाण्याचा मुहूर्त हुकला आहे. त्यामुळे म्हाडा आणि सरकारने आता दिवाळी पूर्वी तरी आमच्या नव्या घरांचे चावीवाटप करावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. येथील पुनर्वसन प्रकल्पामधील ५५७ सदनिकाचे काम पूर्ण झाले असल्याने म्हाडानेही चावीवाटपाची तयारी सुरू केली होती, मात्र मुख्यमंत्र्यांची वेळ न मिळाल्याने मुहूर्त हुकला असल्याने रहिवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प राज्य शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग या बीडीडी चाळींचा पुनर्विकास केला जात आहे. ना. म. जोशी मार्ग येथील ३२ चाळींमधील २५६० रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी २३ मजल्यांचे १४ टाॅवर उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे.
पहिल्या टप्प्यात पुनर्वसन इमारत क्र. १ मधील ई, एफ, जी विंग मधील ५५७ घरांचे काम पूर्ण झाले आहे. त्याबाबत म्हाडानेही दसऱ्याच्या मुहूर्तावर घरांचा ताबा देण्याची तयारी सुरू केली होती. त्याचाच भाग म्हणून चावीवाटपासाठी म्हाडाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची वेळ मागितली होती. त्यानुसार कार्यक्रमाची तारीख, वेळ निश्चित केली जाणार होती, मात्र मुख्यमंत्र्यांकडून वेळच न मिळाल्याने एकूणच कार्यक्रम निश्चित होऊ शकला नाही. त्यामुळे रहिवाशांमध्ये नाराजी आहे. पुनर्विकास वेळेत व्हावा म्हणून सर्वात आधी आम्ही घरे रिकामी केली होती, तरीही आमच्या प्रकल्पाला आधी तांत्रिक कारणामुळे तर आता प्रमुख पाहुण्यांना वेळ नसल्याने विलंब होत असल्याची खंत रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
आता दसऱ्याचा मुहूर्त हुकला आहे. त्यामुळे म्हाडाने आणि सरकारने दिवाळी पूर्वी तरी आम्हाला घरांचा ताबा द्यावा. त्यामुळे आमच्या दिवाळीचा आनंद द्विगुणीत होईल. मुख्यमंत्र्यांना अगदीच वेळ नसेल, तर सह्याद्री अतिथीगृहात छोटेखानी कार्यक्रम घेऊन आम्हाला प्रतिनिधिक चावीवाटप करावे.
- कृष्णकांत नलगे, अध्यक्ष, ना. म. जोशी मार्ग बीडीडी पुनर्विकास समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.