वृक्षताेडीच्या प्रस्तावांना विराेध
पुनर्लागवडीच्या जागेच्या पाहणी अहवालाची मागणी
वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांसाठी वृक्षतोड आणि पुनर्रोपणाच्या बदल्यात करण्यात येणाऱ्या भरपाई वृक्षारोपणाच्या जागांची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करावा. तसेच संबंधित जागांवर वृक्षारोपणासाठी आवश्यक परवानग्या मिळाल्याची खात्री करावी. हा अहवाल सादर होईपर्यंत वृक्षतोडीच्या प्रस्तावांना मंजुरी देऊ नये, अशी मागणी नगरसेवक आणि वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य प्रमाेद सावंत यांनी बुधवारी झालेल्या बैठकीत केली.
महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची बैठक आज झाली. या बैठकीत वांद्रे येथील पाली हिल परिसरातील नियोजित इमारतीच्या तळघराच्या खोदकामात बाधित होणारी २८ झाडे कापणे आणि ३५ झाडांचे पुनर्रोपण करणे, तसेच अंधेरी पूर्वेतील एकत्रित झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील बांधकामासाठी २२ झाडे कापणे आणि आठ झाडांचे पुनर्रोपण करण्यासंबंधीच्या प्रस्तावांवर चर्चा झाली.
वांद्रे येथील प्रकल्पासाठी बाधित झाडांच्या बदल्यात आरे, तुळशी वनक्षेत्रातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात १,१७५ झाडे, तर अंधेरीतील पुनर्विकास प्रकल्पासाठी जोगेश्वरी पूर्व येथील इस्माईल युसूफ महाविद्यालयाच्या परिसरात ५५० झाडे लावण्याचे विकसकाने प्रस्तावित केले आहे. या दोन्ही ठिकाणी वृक्षारोपणासाठी संबंधित प्राधिकरणांची परवानगी मिळाली आहे का, तसेच महापालिका अधिकाऱ्यांनी या जागांची प्रत्यक्ष पाहणी केली आहे का, याबाबतचा अहवाल सादर करण्यात आलेला नसल्याचे सावंत यांनी निदर्शनास आणले. भरपाई वृक्षारोपण पारंपरिक पद्धतीने की मियावाकी पद्धतीने करण्यात येणार, याबाबतही स्पष्टता नसल्याने त्यांनी आक्षेप घेतला. प्रशासनाने प्रत्येक प्रस्तावाबाबत आयुक्त आणि समिती सदस्यांना वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी भूमिका सावंत यांनी मांडली.
.................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.