ऑलिव्ह ऑइलच्या नावाखाली शेंगदाणा तेलाची विक्री
राज्यभरात एफडीएची धडक कारवाई; ३.११ कोटींचा मुद्देमाल जप्त
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : सणासुदीच्या काळात भेसळ आणि निकृष्ट अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभरात धडक कारवाई केली. या मोहिमेत सुमारे ३.११ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये ३२,०६१ लिटर खाद्यतेल आणि ३७,१२८ किलो इतर अन्नपदार्थांचा समावेश आहे. मुंबईतील चार अन्न आस्थापनांचे परवानेही निलंबित करण्यात आले. भिवंडीतील मे. विराज एन्टरप्रायजेसमधून ११,७७९ लिटर खाद्यतेल आणि २,८५० किलो चहा असा १.२७ कोटी रुपयांचा साठा जप्त झाला. जिवो ब्रँडचे पोमेस ऑलिव्ह ऑइल प्रत्यक्षात शेंगदाणा तेल असल्याचे प्रयोगशाळा तपासणीत उघड झाले.
छत्रपती संभाजीनगर विभागात परभणीतील तीन आस्थापनांतून ९,३१६ किलो खाद्यतेल आणि मोती नमकीनमधून २२,५५० किलो शेव-फरसाण मिश्रण जप्त करण्यात आले. या साठ्याची एकूण किंमत ८१.७१ लाख रुपये आहे. धाराशिवमध्ये खवा, पेढे आणि कलाकंद जप्त करण्यात आले. वैजापूरमधून ३४३ किलो तूप, तर सिल्लोडमधून १,०१३ किलो बेकरी पदार्थ जप्त झाले. नागपूर विभागात १,०७८.४० लिटर सोयाबीन तेल आणि ४९ किलो खवा जप्त झाला. पुणे विभागात नऊ हजार किलो पनीर, ४४० किलो खवा, ७७.७५ किलो इतर अन्नपदार्थ आणि ९,८८८ लिटर खाद्यतेल जप्त करण्यात आले. अहिल्यानगरमधील श्रीगोंदा तालुक्यातून ८७ किलो भगर जप्त केली. कांदिवलीत रंगाचा संशय असलेले वेफर्स, फरसाण, जिलेबी आणि हलवा जप्त करण्यात आला. जालन्यात प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखू, वाहन आणि इतर साहित्य मिळून ८३.३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
परवाने निलंबित
मुंबईतही प्रतिबंधित साठा आणि वाहनासह सुमारे १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा नोंदविण्यात आला. मुंबईतील खाद्य आस्थापनांमध्ये अस्वच्छता, अनधिकृत खाद्यरंगांचा वापर, गंजलेली भांडी, परत आलेला पाव ताज्या पावात मिसळणे आणि वैद्यकीय प्रमाणपत्रांचा अभाव असे प्रकार आढळले. त्यामुळे चार आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले.