कसारा मार्गावर १५ डब्यांच्या लोकल
१५ नोव्हेंबरपासून १२ डब्यांच्या १८ फेऱ्यांचे रूपांतर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : कसारा मार्गावरील लोकल प्रवाशांसाठी दिवाळीत खुशखबर मिळणार आहे. मध्य रेल्वेने या मार्गावरील १२ डब्यांच्या १८ लोकल फेऱ्यांचे १५ डब्यांच्या लोकलमध्ये रूपांतर करण्याचे नियोजन केले आहे. या लोकल १५ नोव्हेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. त्यामुळे नव्या फेऱ्या न वाढवताच प्रत्येक लोकलची प्रवासी क्षमता सुमारे २५ टक्क्यांनी वाढणार आहे. परिणामी गर्दीच्या वेळेत प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
मध्य रेल्वेने १५ ऑगस्टपासून १२ डब्यांच्या २२ लोकल फेऱ्यांचे १५ डब्यांच्या लोकलमध्ये रूपांतर केले होते. त्यामुळे १५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांची संख्या ३२ वरून ५४ झाली होती. आता कसारा मार्गावरील आणखी १८ फेऱ्यांचे रूपांतर झाल्यानंतर ही संख्या ७२ वर पोहोचणार आहे. विशेष म्हणजे मध्य रेल्वेच्या एकूण १,८२० लोकल फेऱ्यांची संख्या कायम ठेवूनच प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढविण्यात येणार आहे.
टिटवाळ्यात फलाटाचा विस्तार
१५ डब्यांच्या लोकल चालविण्यासाठी टिटवाळा स्थानकात नुकताच विशेष ब्लॉक घेण्यात आला. या काळात फलाटाच्या विस्तारीकरणासह रेल्वे रुळांशी संबंधित कामे, सिग्नल यंत्रणेतील बदल आणि ओव्हरहेड वायरची कामे करण्यात आली. या कामांमुळे कसारा मार्गावर १५ डब्यांच्या लोकल चालविण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.
कसारा, आसनगावच्या प्रवाशांना दिलासा
कसारा, आसनगाव, आटगाव आणि टिटवाळा परिसरातून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी मुंबईकडे प्रवास करतात. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत लोकलमध्ये चढताना प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते. १५ डब्यांच्या लोकलमुळे प्रत्येक फेरीत अधिक प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. त्यामुळे गर्दीचा ताण कमी होण्यास मदत होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.