मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळित
विक्रोळी-घाटकोपरदरम्यान जखमी तरुणामुळे लोकल रखडली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : मध्य रेल्वेच्या विक्रोळी आणि घाटकोपर स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या मधोमध डोक्याला दुखापत झालेला सुमारे ३० वर्षांचा तरुण आढळल्याने शुक्रवारी (ता. २३) सकाळी अप धीमी लोकल १४ मिनिटे थांबवण्यात आली. सकाळच्या गर्दीच्या वेळी घडलेल्या या घटनेचा परिणाम पाठीमागून येणाऱ्या लोकल सेवांवरही झाला. परिणामी मध्य रेल्वेवरील लोकल २० ते ३० मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे वेळापत्रक कोलमडले. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी दादर स्थानक व्यवस्थापक कार्यालयात धाव घेत नाराजी व्यक्त केली.
विक्रोळी आणि घाटकोपर स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या मधोमध हा तरुण जखमी अवस्थेत आढळला. त्यामुळे या मार्गावरील अप धीमी लोकल सकाळी ८.३५ ते ८.४९ या वेळेत थांबवण्यात आली. संबंधित लोकलच्या ट्रेन मॅनेजरने जखमी तरुणाला मदत करून घाटकोपर स्थानकातील उपस्थानक व्यवस्थापकांकडे सुपूर्द केले. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी त्याला उपचारांसाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले. तरुणाला दुखापत नेमकी कशी झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे शुक्रवारी सकाळी कसारा दिशेकडून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल २० ते ३० मिनिटे उशिराने धावत होत्या. काही लोकल एकामागोमाग उभ्या राहिल्याने त्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. परिणामी, प्रवाशांना लोकलमध्ये आणि स्थानकांवर खोळंबून राहावे लागले. नोकरदार आणि विद्यार्थ्यांना कामाच्या ठिकाणी तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये वेळेत पोहोचण्यात अडचणी आल्या.
संतप्त प्रवाशांची तक्रार
लोकलच्या अनियमित वेळापत्रकामुळे संतप्त प्रवाशांनी दादर स्थानक व्यवस्थापक कार्यालयात जाऊन तक्रारी मांडल्या. लोकलचा वक्तशीरपणा राखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. लोकलच्या विलंबामुळे दैनंदिन प्रवासाचे नियोजन बिघडत असल्याची नाराजीही प्रवाशांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.