बॉलीवूडमध्ये पुन्हा अंडरवर्ल्डची दहशत
सिने कलाकार संघटनेचे अमित शहांना पत्र
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर बॉलीवूड कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने (एआयसीडब्ल्यूए) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून टायगर श्रॉफ आणि कुटुंबीयांना तातडीने सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे. बॉलीवूडमध्ये पुन्हा एकदा अंडरवर्ल्डची दहशत पसरली असून, कलाकारांना लक्ष्य करण्याच्या घटनांबाबतही संघटनेने चिंता व्यक्त केली आहे.
जुहू परिसरात मोटारीवर झालेल्या गोळीबारात टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला असला, तरी या घटनेत दोघे जण जखमी झाले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर टायगर श्रॉफच्या सुरक्षेसाठी तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संघटनेने केली आहे. बॉलीवूडमधील व्यक्तींना लक्ष्य करण्याच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत. अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर झालेला गोळीबार, अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या घरात झालेला चाकूहल्ला, दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानाबाहेर झालेला गोळीबार, विनोदी कलाकार कपिल शर्माच्या कॅनडातील कॅफेवरही हल्ला झाला होता. चित्रपटसृष्टीतील व्यक्तींना धमकावून खंडणी उकळण्याच्या उद्देशाने काही गुन्हेगारी टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी ठोस सुरक्षा व्यवस्था उभारण्याची गरज असल्याचे संघटनेने पत्रात म्हटले आहे.
----
केंद्राने हस्तक्षेप करावा!
देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि जागतिक स्तरावरील प्रतिमेत बॉलीवूड महत्त्वाचे योगदान देते. या क्षेत्राशी संबंधित अनेक कलाकार, तंत्रज्ञ आणि कामगारांच्या उपजीविकेचा प्रश्नही सुरक्षेशी जोडलेला आहे. चित्रपटसृष्टीतील व्यक्तींना निर्भयपणे काम करता यावे, यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा. मुंबईत १९९० च्या दशकातील अंडरवर्ल्डची दहशत पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी गुन्हेगारी टोळ्यांविरोधात कठोर कारवाई करावी, असे आवाहनही संघटनेने केंद्रीय गृहमंत्र्यांना केले आहे.
..........