गरीब रथ एक्स्प्रेसमध्ये टीटीईला मारहाण
मद्यधुंद प्रवाशाच्या हुल्लडबाजीला विरोध केल्याने हल्ला
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : गरीब रथ एक्स्प्रेसमध्ये मद्यधुंद प्रवाशाच्या हुल्लडबाजीला विरोध केल्याने तिकीट तपासनीसाला (टीटीई) शुक्रवारी (ता. २३) मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात बसंत हे टीटीई जखमी झाले आहेत. हल्लेखोरांनी तिकीट तपासणीसाठी वापरली जाणारी ईएफटी आणि एचएचटी ही यंत्रेही हिसकावून घेतली. या घटनेनंतर वांद्रे टर्मिनस येथे रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि लोहमार्ग पोलिसांनी या गाडीची तपासणी केली.
हजरत निजामुद्दीनहून वांद्रे टर्मिनसकडे येणाऱ्या १२९१० क्रमांकाच्या गरीब रथ एक्स्प्रेसमध्ये हा प्रकार घडला, मद्यधुंद प्रवासी शिट्टी वाजवून आणि गोंधळ घालून इतर प्रवाशांना त्रास देत होता, याबाबत टीटीई अमित आणि बसंत यांनी रात्री १.२७ वाजता रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर पहाटे २.१४ वाजता काही प्रवाशांनी बसंत यांना मारहाण करून त्यांच्याकडील तिकीट तपासणीची यंत्रे हिसकावून घेतली. या घटनेनंतर पहाटे २.३४ वाजता गोधरा स्थानकात गाडी थांबवण्याची मागणी करण्यात आली, मात्र गाडी तेथे थांबवण्यात आली नाही. वडोदरा स्थानकात आरपीएफचे पथक दाखल झाले; परंतु गाडीतील मोठ्या गर्दीमुळे संशयितांना ताब्यात घेण्यात अडचणी आल्याचे वृत्त आहे. ही गाडी वांद्रे टर्मिनस येथे पोहोचल्यानंतर आरपीएफ, लोहमार्ग पोलिस आणि तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी तपासणी केली. मथुरा बार कौन्सिलच्या ६६४ सदस्यांनी या प्रवासासाठी आरक्षण केले होते. वांद्रे टर्मिनस येथे १५० हून अधिक सुरक्षा कर्मचाऱ्यांनी गाडीची झडती घेतली. गटप्रमुख राघवेंद्र सिंह यांच्यासह काही प्रवाशांची चौकशी करण्यात आली, मात्र मुख्य संशयिताचा शोध लागला नाही. समाजमाध्यमांवर चर्चेत असलेले निहाल सिंह हे नाव आरक्षण यादीत आढळले नाही. वडोदरा येथे दाखल झालेल्या प्रथम माहिती अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.
सुरक्षेचा प्रश्न
पश्चिम रेल्वे मजदूर संघाचे सरचिटणीस आर. जी. काबर यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली. या प्रकरणाची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.