हरवलेल्यांना शोधण्यासाठी निवृत्तीनंतरही ध्यास
राजेश पांडेय यांची ३२ वर्षांची अनुभव शिदोरी; हजार व्हॉट्सॲप समूहांच्या माध्यमातून शोधमोहीम
मयूर फडके ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : पोलिस सेवेतील निवृत्तीनंतरही हरवलेल्या व्यक्तींना शोधून त्यांच्या कुटुंबीयांशी पुन्हा भेट घडवून आणण्याचे कार्य मुंबईतील माजी पोलिस अधिकारी राजेश पांडेय (वय ६०) करत आहेत. ३२ वर्षांच्या सेवेत सुमारे तीन हजार हरविलेल्या प्रकरणांचा तपास करणारे पांडेय २०२५ मध्ये निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी हरवलेल्यांना शोधण्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे.
१९९२ मध्ये वडिलांच्या निधनानंतर आपल्या चार धाकट्या बहिणींना आधार देण्याच्या उद्देशाने त्यांनी पोलिसांची नोकरी स्वीकारली. २०११ मध्ये सांताक्रूझ पोलिस ठाण्यात कार्यरत असताना त्यांनी एका महिलेच्या अपहरण झालेल्या त्या मुलाला त्याच्या आईच्या विभक्त पतीकडून शोधण्यात त्यांना यश आले. या अनुभवामुळे हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याची आवड पांडेय यांना निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी संपूर्ण पोलिस कारकिर्दीत हरवलेल्या व्यक्तींच्या प्रकरणांचा गांभीर्याने पाठपुरावा केला. त्या आधी ते एका कुरिअर सेवेत कार्यरत असल्याने मुंबईसह महाराष्ट्र दिल्ली, कोलकता, चेन्नई, कर्नाटक, गुजरात अशा राज्यात त्यांचा दौरा व्हायचा. त्या कामाचा फायदा त्यांना या शोधमोहिमांमध्ये झाला. विशेषतः बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यपद्धतीचा उपयोग इतर पोलिसांनाही होत आहे. पुढे त्यांनी स्वतःची ‘पांडेय मॉड्यूल’ ही कार्यपद्धती विकसित केली. टॅक्सीचालक, हॉटेल कर्मचारी, आश्रम आणि स्वयंसेवी संस्थांतील प्रतिनिधींच्या संपर्कातून ते माहिती मिळवतात. जवळपास एक हजार व्हॉट्सॲप समूहांवर हरवलेल्या व्यक्तींचे तपशील प्रसारित करून शोधमोहीम राबवतात.
झारखंडचा थरारक अनुभव
मालाड पोलिस ठाण्यात असताना एका मिसिंग खटल्याचा थरारक अनुभव पांडेय यांना आला. एक अल्पवयीन मुलगी आपल्या मित्रासोबत पळून गेल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. त्या मुलाचा नंबर ट्रॅक केल्यावर तो नंबर झारखंड येथे चालू-बंद होत असल्याचे समजले. त्याच वेळी, वरिष्ठ सातार्डेकर, स्वतः पांडेय आणि एक महिला हवालदार अशी टीम झारखंडला रवाना झाली. तिथे झारखंड पोलिसांचे सहकार्य लाभले. झारखंडमधील आदिवासी पाड्यात त्या दोघांचा पत्ता मिळाला. तिथे गेल्यावर त्या दोघांच्या लग्नाची तयारी सुरू होती. त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलिस आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. जमाव बिथरला आणि पोलिसांच्या गाड्या अडवण्यात आल्या. स्थानिक पोलिस आणि पांडेय यांनी त्यांची समजूत काढली.
बहीण-भावाचा शाेध
निवृत्तीनंतर यूपीहून एकदा एक बहीण-भाऊ चित्रपटात काम करण्यासाठी मुंबईत पळून आले होते. पांडेय निवृत्त असले तरी याप्रकरणी त्यांची मदत घेण्यात आली. त्यांच्या इतक्या वर्षांच्या अनुभवातून त्यांनी आपल्या सोर्सच्या मदतीने त्यांना ट्रॅक केल्यानंतर ती वांद्रे येथील शाहरुख खानच्या निवासस्थानाबाहेर फिरताना दिसली आणि त्यांना ताब्यात घेऊन कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.
‘ऑपरेशन मुस्कान’मध्ये योगदान
२०१६ मध्ये तत्कालीन पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी सुरू केलेल्या ‘ऑपरेशन मुस्कान’मध्ये पांडेय यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. २०२५ मध्ये बेपत्ता झालेल्या २,१८२ अल्पवयीन मुलांपैकी २,१६५ मुलांच्या शोधात त्यांची मदत झाली आहे.
विविध पुरस्कारांनी सन्मान
पांडेय यांच्या अतुलनीय कौशल्याबद्दल विविध पोलिस विभागाकडून त्यांना गौरविण्यात आले आहे. त्यांना २०१७ मध्ये पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे सन्मान चिन्ह हे पदक बहार केले आहे. तसेच पोलिस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्याकडून तीन वेळा बक्षीस व प्रमाणपत्र देऊन तर दिल्ली, पश्चिम बंगाल, गुजरात, तसेच उत्तर प्रदेश राज्याकडून २०१३ मध्ये पूर्वांचल गौरव सन्मान मिळाला आहे.
पोलिस सेवेतील गणवेश उतरवला असला, तरी हरवलेल्या व्यक्तींना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आणि तळमळ आजही आपल्यात कायम आहे. श्वासापर्यंत हरवलेल्या व्यक्तींना शोधण्याचे हे काम सुरूच ठेवणार.
– राजेश पांडेय, निवृत्त पोलिस अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.