सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : कार्बन समस्थानिकांच्या चाचण्यांसाठी परदेशातील प्रयोगशाळांवर अवलंबून राहण्याची गरज कमी करण्याच्या दृष्टीने मुंबई विद्यापीठाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. विद्यापीठाच्या मुंबई युनिव्हर्सिटी एक्सलरेटर सेंटर (एमयूएसी) अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कार्बन समस्थानिकांच्या चाचण्या करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. या सुविधेमुळे विशेषतः सुगंध आणि स्वाद उद्योगातील उत्पादनांची अस्सलता तपासण्यास मदत होणार असून, संशोधन आणि उद्योग क्षेत्रालाही त्याचा लाभ मिळणार आहे.
या सुविधेचा उद्योग क्षेत्राला परिचय करून देण्यासाठी मुंबई विद्यापीठात नुकतेच एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. सेंद्रिय नमुन्यांमधील कार्बन समस्थानिकांचा अभ्यास आणि त्यासाठी वापरले जाणारे ॲक्सिलरेटर मास स्पेक्ट्रोमेट्री-एएमएस हे या चर्चासत्राचे प्रमुख विषय होते. यामध्ये शास्त्रज्ञ, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योग प्रतिनिधींसह टाटा मूलभूत संशोधन संस्था, भाभा अणुसंशोधन केंद्र, राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था आणि आयआयटी गांधीनगर येथील तज्ज्ञांनी सहभाग घेतला.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रा. वर्षा केळकर-माने यांच्या संयोजनातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नवी दिल्ली येथील आंतरविद्यापीठीय प्रवेगक केंद्राचे संचालक डॉ. अविनाश चंद्र पांडे यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून या सुविधेचे महत्त्व स्पष्ट केले.
संशाेधन, उद्याेग क्षेत्राला लाभ
मुंबई विद्यापीठात कार्यान्वित करण्यात आलेल्या एएमएस सुविधेमुळे मुंबई विद्यापीठाचा समावेश भारतातील प्रगत प्रवेगक-आधारित संशोधन सुविधा असलेल्या मोजक्या संस्थांमध्ये झाला आहे. या सुविधेमुळे शैक्षणिक क्षेत्र आणि उद्योग यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होऊन दोन्ही क्षेत्रांना परस्परपूरक लाभ मिळेल.
उत्पादनांची अस्सलता ओळखणे शक्य
कार्बन-१२ आणि कार्बन-१३ या समस्थानिकांचे गुणोत्तर तपासून उत्पादनांमधील घटकांचे स्वरूप आणि त्यांचे मूळ याविषयी महत्त्वाची माहिती मिळू शकते. तसेच कार्बन-१४ चाचणीद्वारे पुरातत्त्वीय वस्तू आणि इतर योग्य नमुन्यांचे कालमापन निश्चित करता येते. सुगंध आणि स्वाद उद्योगात नैसर्गिक व कृत्रिम घटकांमधील फरक ओळखण्यासाठी तसेच उत्पादनांच्या अस्सलतेची पडताळणी करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होतो. त्यामुळे उत्पादनांची गुणवत्ता आणि विश्वासार्हता राखण्यास मदत होणार आहे.
मुंबई : एकदिवसीय चर्चासत्रात शास्त्रज्ञ, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योग प्रतिनिधींनी सहभाग नाेंदवला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.