एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन द्या!
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रशासनाला निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सुमारे ८३ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी नोव्हेंबरचे वेतन दिवाळीपूर्वी अदा करण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला रविवारी (ता. २५) दिले.
एसटी महामंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहिन्याला साधारणतः ७ ते १० तारखेदरम्यान अदा केले जाते. मात्र, यंदा ६ नोव्हेंबरपासून दिवाळी सणाला सुरुवात होत असल्याने कर्मचाऱ्यांना सणापूर्वीच वेतन मिळणे आवश्यक आहे. दिवाळीच्या सणासाठी कुटुंबीयांसह खरेदी, घरगुती खर्च आणि इतर नियोजन करता यावे, यासाठी कर्मचाऱ्यांच्या हातात वेळेत पगार पडणे महत्त्वाचे आहे, ही बाब लक्षात घेऊन मंत्री सरनाईक यांनी प्रशासनाला वेतनासाठी आवश्यक ती पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत. दिवाळीपूर्वी वेतन देण्यासाठी एसटी महामंडळाच्या अर्थ व नियोजन विभागाने तातडीने शासनाकडे पाठपुरावा करावा, कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आवश्यक असलेले अनुदान तसेच मागील महिन्यातील विविध प्रवासी सवलत योजनांच्या प्रतिपूर्तीपोटी शासनाकडून मिळणारी प्रलंबित रक्कम वेळेत उपलब्ध होण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
समन्वय साधण्याच्या सूचना
एसटी महामंडळाच्या आर्थिक अडचणींमुळे कर्मचाऱ्यांच्या सणाच्या आनंदावर विरजण पडू नये, यासाठी प्रशासनाने या विषयाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध होण्यासाठी समन्वय साधून वेतन वितरणाचे नियोजन करावे आणि दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना पगार मिळेल या दृष्टीने दक्षता घ्यावी, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.