सर्व अभ्यासक्रमांसाठी वर्षातून दोनदा सीईटी
नवीन शैक्षणिक वर्षात अंमलबजावणी
मुंबई, ता. २६ : तांत्रिक, व्यावसायिक, वैद्यकीय तसेच उच्च शिक्षणातील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) वर्षातून दोन वेळा आयोजित करण्यात येणार आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली. या निर्णयाचा राज्यातील १४ लाखांहून अधिक सीईटी परीक्षार्थींना लाभ होण्याची शक्यता आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठातील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री पाटील यांनी सर्व अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा सीईटी घेण्याची माहिती दिली. यापूर्वी अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यवस्थापन या तीन अभ्यासक्रमांसाठीच विद्यार्थ्यांना दोन वेळा सीईटी देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. आता विधी, बीएड यांसह विविध तांत्रिक, व्यावसायिक आणि उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही दुसऱ्यांदा परीक्षा देऊन आपले गुण सुधारता येणार आहेत. राज्यातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी कक्ष) एकूण १९ स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. चालू शैक्षणिक वर्षासाठी या परीक्षा मार्च ते मे या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. त्यांचे तात्पुरते वेळापत्रक गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जाहीर करण्यात आले होते. यंदा पहिल्यांदाच अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यवस्थापन या अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा परीक्षा देण्याची संधी उपलब्ध झाली होती. अभियांत्रिकीची सीईटी जेईईच्या धर्तीवर डिसेंबर आणि मार्च-एप्रिलमध्ये घेण्याचे नियोजन होते, मात्र विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार परीक्षा मार्च-एप्रिल-मे या कालावधीत घेण्याचा निर्णय सीईटी कक्षाने घेतला होता.
...
कार्यपद्धती निश्चित होणार
सीईटी परीक्षांचे आयोजन कशा पद्धतीने करायचे, याबाबत सीईटी कक्षाकडून कार्यपद्धती तयार केली जात आहे. येत्या १५ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. परीक्षा केंद्रे, परीक्षेचे स्वरूप, नियमावली आणि उत्तरपत्रिका तपासण्याची यंत्रणा यांसंबंधीचे निकष त्यात निश्चित केले जाणार आहेत.