कोलामार्क, विस्तारित तानसाला अभयारण्यांचा दर्जा
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : राज्यातील वन्यजीव संवर्धनाला चालना देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील कोलामार्का आणि तानसा परिसरातील विस्तारित वनक्षेत्राला वन्यजीव अभयारण्याचा दर्जा देण्याच्या प्रस्तावांना राज्य सरकारने मान्यता दिली आहे. याशिवाय पुणे, रायगड, नाशिक, नंदुरबार, ठाणे, पालघर आणि चंद्रपूर या सात जिल्ह्यांतील १४ संवर्धन राखीव क्षेत्रांच्या प्रस्तावांनाही मंजुरी देण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाच्या २६व्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. गडचिरोलीतील कोलामार्का संवर्धन राखीव क्षेत्र रानम्हशींच्या अधिवासासाठी महत्त्वाचे असल्याने त्याला अभयारण्याचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. तानसा वन्यजीव अभयारण्याच्या विस्तारालाही मंजुरी देण्यात आली. यासाठी ओगदा, खोडदे, तिरमाळ, पाचघर, फणसाड आणि आमले या सहा गावांतील ५८८.७६७ हेक्टर महसुली व खासगी क्षेत्राचा समावेश करण्यात येणार आहे. मंजुरी मिळालेल्या १४ संवर्धन राखीव क्षेत्रांमध्ये पुणे-रायगडमधील वेल्हे-मुळशी आणि लोणावळा, पुण्यातील भोरगिरीगड, नाशिकमधील दिंडोरी, सुरगणा व ताहाराबाद, नंदुरबारमधील चिंचपाडा, रायगडमधील अलिबाग व घेरा माणिकगड, ठाण्यातील गुमतारा, पालघरमधील जव्हार, आशेरीगड व धामणी आणि चंद्रपूरमधील एकारा यांचा समावेश आहे. याशिवाय कोका अभयारण्यातील १००.१३९ चौरस किलोमीटर आणि जायकवाडी पक्षी अभयारण्यातील २५५.७९ चौरस किलोमीटर क्षेत्र धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास म्हणून घोषित करण्याच्या प्रस्तावांनाही मंजुरी देण्यात आली.
...
आवश्यक सुधारणा
अभयारण्यांमधील धरणांची दुरुस्ती, पुनर्वसन आणि गाळ काढण्याच्या कामांसाठी व्यवस्थापन आराखड्यात आवश्यक सुधारणा तीन महिन्यांत करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच मानव-वन्यजीव संघर्षाला नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यासह व्याघ्र प्रकल्पांच्या बफर क्षेत्रातील इच्छुक गावांच्या पुनर्वसनासाठी धोरण तयार करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.