वर्गखोल्यांसाठी निविदेला बगल
३७.६९ लाखांचे काम नव्या कंत्राटदाराला देण्याचा प्रस्ताव
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : कुलाबा येथील महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तात्पुरत्या वर्गखोल्या उभारण्याचे काम रखडल्याने महापालिकेने हे काम नव्या कंत्राटदारामार्फत तातडीने पूर्ण करण्याची तयारी केली आहे. त्यासाठी सार्वजनिक वृत्तपत्रात जाहिरात देऊन निविदा मागविण्याची अट शिथिल करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडण्यात आला आहे. सुमारे ३७.६९ लाख रुपयांचे हे काम वीर इन्फ्राप्रोजेक्ट्स या कंत्राटदाराला देण्याचे प्रस्तावित आहे.
ए विभागातील एन. ए. सावंत मार्गावरील कुलाबा प्राथमिक महानगरपालिका शाळेची इमारत १९६४ मध्ये बांधण्यात आली होती. तळमजला आणि तीन मजले असलेल्या या इमारतीची संरचनात्मक स्थिती खराब झाली असून, प्लास्टर आणि काँक्रीट पडण्याच्या घटना वारंवार घडत होत्या. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही इमारत रिकामी करून शालेय कामकाज बोरा बाजार आणि कुलाबा मार्केट महापालिका शाळेत स्थलांतरित करण्यात आले. स्थलांतरित विद्यार्थ्यांसाठी कुलाबा मार्केट शाळेतील सभागृहात तात्पुरत्या वर्गखोल्या उभारण्यास शिक्षण विभागाने डिसेंबर २०२५मध्ये ना हरकत प्रमाणपत्र दिले होते.
या कामासाठी महापालिकेने २७ मार्च २०२६ला ई-निविदा मागवली होती. त्यात सर्वांत कमी दर देणाऱ्या जे. पी. इन्फ्राप्रोजेक्ट्स या कंत्राटदाराची निवड करण्यात आली. त्याला २ जूनला निविदा स्वीकृती पत्रही देण्यात आले. मात्र या कंत्राटदाराने १२ जूनपासून काम पूर्णपणे थांबवले. महापालिकेला कोणतीही लेखी अथवा तोंडी सूचना न देता त्याने जागेवरील साहित्य, कामगार आणि यंत्रसामग्री हटवली. तसेच आवश्यक असलेली नऊ लाख १८ हजार ३०० रुपयांची अतिरिक्त सुरक्षा ठेव आणि सात लाख ६० हजार ६०० रुपयांचे बँक हमीपत्रही सादर केले नाही. त्यामुळे त्याची निविदा आणि कंत्राट रद्द समजण्यात आले असून, संबंधित कंत्राटदारावर स्वतंत्र कारवाई सुरू आहे.
दरम्यान, नव्याने निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी तीन ते चार महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आधीच नियुक्त असलेल्या परिमंडळ-१ मधील वीर इन्फ्राप्रोजेक्ट्सकडून हे काम करून घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मात्र, या कामासाठी नव्याने स्पर्धात्मक निविदा मागवण्यात आलेल्या नाहीत.
अट शिथिल करणार
मुंबई महापालिका अधिनियमानुसार तीन लाख रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या कामांसाठी सार्वजनिक जाहिरात देऊन निविदा मागविणे आवश्यक आहे. मात्र, काम तातडीने पूर्ण करण्याची गरज लक्षात घेऊन जाहिरातीद्वारे निविदा मागविण्याची अट शिथिल करण्यासाठी स्थायी समितीची कार्योत्तर मंजुरी मागण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि गैरसोय कमी करण्यासाठी हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.