लोकलच्या समस्यांवरून प्रवासी संघटना आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : मेगाब्लॉक घेऊनही लोकलचा खोळंबा आणि प्रवाशांची गर्दी कमी होत नसल्याने रेल्वेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सोमवारी मध्य रेल्वेची सेवा नऊ तास विस्कळित झाली. याबाबत जाब विचारण्यासाठी १० प्रवासी संघटनांनी बुधवारी मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक हिरेश मीना यांची भेट घेतली. प्रवाशांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.
ठाणे ते कसारा आणि कर्जतदरम्यानच्या प्रवाशांचे मोठे हाल झाले. सायंकाळी सहानंतर सेवा पूर्ववत झाल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला; मात्र रात्री उशिरापर्यंत लोकल ३० ते ४० मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला, असे संघटनांनी सांगितले. याप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई आणि विशेष लोकलच्या वापराबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन प्रशासनाने दिल्याचे प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी नंदकुमार देशमुख यांनी सांगितले. उपनगरी रेल्वेवरील गर्दी कमी करण्यासाठी कार्यालयीन वेळांमध्ये बदल करण्याची मागणी गेल्या १२ वर्षांपासून प्रलंबित आहे. मुंब्रा येथील रेल्वे अपघातानंतर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली; मात्र ठोस निर्णय झालेला नाही. रेल्वे प्रशासनाने राज्य सरकारकडे या विषयाचा पाठपुरावा करावा, अशी मागणी संघटनांनी केली.
...
नोव्हेंबरमध्ये पुन्हा बैठक
प्रवाशांच्या समस्यांवर झालेली चर्चा आणि भविष्यात प्रवाशांसाठी करता येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी नोव्हेंबरमध्ये पुन्हा बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक हिरेश मीना यांनी प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींना दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.